अहमदनगर - ज्येष्ठ पत्रकार, दैनिक 'लोकसत्ता'चे वरिष्ठ बातमीदार, शेती, पाणी, सहकार व राजकारणाचे अभ्यासक अशोक तुपे यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सून, आई, तीन भाऊ असा परिवार आहे.
अशोक तुपे यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा त्यांच्या गावी कान्हेगाव (श्रीरामपूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.दिलीप, विलास व किशोर तुपे यांचे ते भाऊ, तर अभिजीत व निखील तुपे यांचे वडील होते. तुपे यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
अशोक तुपे हे गेल्या काही दिवसांपासून करोना संसर्गामुळे नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी करोनावर मातही केली होती. त्यांना रुग्णालयातून घरी सोडले जाणार होते. परंतु गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
ग्रामीण भागात वार्ताहर म्हणून काम करणाऱ्यांना त्यांनी सदैव मार्गदर्शन केले. सुरुवातीला त्यांनी काही काळ 'दैनिक सार्वमत'मध्ये वार्ताहर म्हणून काम केले. त्यानंतर सन 1995 मध्ये दैनिक 'लोकसत्ता'ची नगर आवृत्ती सुरू झाल्यानंतर ते 'लोकसत्ता'मध्ये रुजू झाले.
अशोक तुपे यांनी ग्रामीण भागात राहूनही पत्रकारितेत भरीव योगदान दिले. शेती, पाणी, सहकार हे त्यांच्या जिव्हाळ्याच्या अभ्यासाचे विषय होते. राज्य सरकार वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कार, वरुणराज भिडे पत्रकारिता पुरस्कारासह विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते.
सामाजिक कार्यात ओढा
शरद जोशी यांचे ३५ वर्षापूर्वी श्रीरामपुरमधील भाषणामुळे तुपे शेतकरी संघटनेच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी शेती प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम सुरु केले. जिल्हा पत्रकार संघाचे सचिव, जिल्हा पत्रकार संघाच्या पत्रकार भवन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, श्रीरामपूर प्रेस क्लबचे कार्यवाह म्हणून त्यांनी काम पाहिले.
साहित्यिक शंकर पाटील घेराव आंदोलनाचे नेतृत्वही यांनी केले होते.खंडकरी शेतकरी चळवळ व शेती महामंडळ कब्जा आंदोलनातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. साहित्यिक शंकर पाटील घेराव आंदोलाचे नेतृत्वही त्यांनी केले होते. अलीकडेच शेतकऱ्यांनी केलेल्या संपातही त्यांचा सक्रीय सहभा होता.
संपर्काचा गाेतावळा
वृत्तपत्र क्षेत्रातील पी. साईनाथ, गिरीश कुबेर, संजय आवटे, राजीव खांडेकर, विजय कुवळेकर, प्रशांत दिक्षीत, आदी दिग्गज पत्रकारांसह राजकीय व्यक्तींशी त्यांचा नियमित संपर्क होता. पत्रकारितेतील नवख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायलाही ते सतत तयार असत. त्यामुळे पत्राकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
'त्या' खटल्यातील महत्वाचे साक्षीदार
दोन दशकांपूर्वी राज्यात गाजलेल्या 'विखे-गडाख निवडणूक खटल्या'मध्ये ते महत्त्वाचे साक्षीदार होते. तसेच 'पेड न्युज' संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणारे ते पहिले पत्रकार होते. गरजवंत रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी मार्गदर्शन करण्यासाठी 'आरोग्यदूत' म्हणूनही ते उत्साहाने काम करत होते.