मुंबई - महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ४३ हजार १८३ नवीन रुग्ण आढळले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. यावेळी लॉकडाऊनबाबत काय निर्णय होण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स व ब्राझीलमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून ४०० टक्के रुग्ण जास्त आढळले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज तातडीची आपत्कालीन आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता सोशल मिडियाच्या माध्यमातून ते जनतेशी लाईव्ह संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्याचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री लॉकडाऊन जाहीर करतील, अशी दाट शक्यता आहे.
मार्च महिन्यात मुंबईमध्ये कोरोनाचे ८८ हजार ७१९ नवीन प्रकरणे समोर आली होती. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रत्येक जिल्ह्याचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज घेत आहेत. तसेच कडक निर्बंध लादण्याच्या सूचनाही देत आहेत. परंतु, तरीही परिस्थिती बिकट होत चालली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी पाच वाजता 'वर्षा' बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाईल. कोरोना रोखण्यासाठी राज्यात कदाचित काही दिवसांपुरते लॉकडाऊन लावले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.