आणि समजा झालाच.. निरोप घ्यायची वेळ आलीच. तर ?

पक्षांचा थवा आकाशात उडताना दिसेल कदाचित...
झाडावरचा चिवचिवाट हळूहळू शांत होतं जाईल..
त्याआधी खूप साऱ्या आठवणी दाटून येतील,
माझं बालपण आठवेल..


आई मला मांडीवर थोपवत थोपवत झोपवायची..
बोटं धरून बाजारात घेवुन जायची...
खाऊचे हट्ट पुरे करायची..
सकाळी सकाळी आंघोळ घालायची,
रडायला लागलो की पाठीत धपाटा ही मिळायचा...
अंगावर पाणी टाकताना 
डोळ्यांत माझ्या खूप सारी स्वप्नही पाहायची..

तिच्या कुशीत खेळता खेळता 
मोठा कधी होत गेलो, कळलं नाही..
कॉलेज जिवनात एसटीने डबा पाठवताना पहाटे उठून
मला आवडणार सारं काही द्यायची..
आई जगली आमच्या सुखासाठी..
थोडे मोठे होत गेलो..
तेव्हा आई उताराकडे झुकली...
आमच्या सुखात रमली...

ती गेली.. तिचं आईपण तेव्हा कळलं..
पोरकेपण जाणवलं..
आई बाबा आपल्या मुलांमध्ये जगत असतात..
घाम पुसत पुसत मुलांमधे आपल जग रंगवत असतात...
कष्ट करणारा बाबा 
कधीं स्वतः साठी जगला नाही..
अंगावरच्या कपड्याची पर्वा कधीं केली नाही..
मुलांचे सारे हट्ट पुरवताना 
फिकीर कधीं केलीच नाही..

आमच्या डोळ्यात स्वतःचे स्वप्न पाहणारा बाबा..
बीपी, शुगरची औषधं घेतं 
डोळ्यातलं पाणी हळुच लपविणारा, 
आमचा हा बाबा सायकलवर कामावरून घरी येताना
स्वतःसाठी कधीच काही करु शकला नाही...
या साऱ्या हेलपाटात दमलेला 
माझा हा देव ही निघून गेला..
न संपणार पोरकेपण देतं...

ज्यांनी दुनिया दाखवली ती आता नाहीत..
त्यांच्यासाठी भिजून आता उपयोगही नाही..
वाट्याला काही राहिलं नाही..
कधी हे खूप आठवतात, मनसोक्त बोलतात..
अजून काळजी करतात..
भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत असतो..
त्यांनी शिकवलं, संस्कार दिला..

प्रवास चालू राहिला..
खूप खेळलो, मैदानाशी दोस्ती केली..
इमानदारी जपली..
सेवा करताना कर्तव्याला बांधिलकी मानली...
जगताना खूप साऱ्या जखमा सोबत घेत 
हसण्याच्या जवळ रहात मजा आणली...
नोकरीत जे करायचं त्यापेक्षा खूप काही केलं..
अपेक्षा कधी केली नाही..

जगजीत, गुलजार, किशोर, वपु, लता, 
आशा, स्मिता, दीप्ती, अमोल, 
नसीरुद्दीन जीवनात खुप काही देत गेले...
मित्रांनी भरभरून प्रेम दिलं..
बायकोने नेहमी मुकाट्यानं ऐकून घेतलं...
ही सगळी माझी माणसे..
माझ्यासाठी झुरणारी...

तेरे बिना जिंदगी भी लेकीन जिंदगी नही...
असं आता प्रत्येकाला म्हणावसं वाटतं...
मी तरी का कोणावर दुःखी होऊ...,,
तुझसे नाराज नही,
जिंदगी हैराण हू मैं...

किल्ल्यांच्या पायरीवर रात्र रात्र बसत खूप स्वप्न पाहिली..
ती बोलतही असतील माझ्याशी..
कितीतरी वेळा चंद्र ही डोकावून गेला असेल..
भिंतीच्या चिरांतून...
या जपलेल्या मखमली आठवणींची ओंजळ.
जाता जाता कुठे रिती करु..?
खूप काही आपलं होतं ..

हट्ट असायचा... 
समाधान ही खूप काही..
निघता निघता एकदा या रे सारे सोबत..
घट्ट मिठीत घ्या मला...
पक्षी त्या फांदीवर बसू देत..
कलकलाट होऊ दे...
एका प्रवासाचा पूर्ण विराम होईलंच आता...
माझं माझं म्हणत जपलेलं सारं अंधुक होत जाईल आता...

- जयंत येलुलकर
(रसिक ग्रुप, अहमदनगर)
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !