'या' कारणामुळे 'हिरण्यकेशी' ठरेल जैविक विविधता वारसा स्थळ

मुंबई - सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली (हिरण्यकेशी) येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये "शिस्टुरा हिरण्यकेशी" (देवाचा मासा) ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली आहे.


यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे.

शिस्टुरा हिरण्यकेशी (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली (हिरण्यकेशी) या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.

या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी (महादेव) मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे. या क्षेत्रात गवे, हरीण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळींदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. 

साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचेही याभागात अस्तित्त्व आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण होण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वाचा आहे.

अशाप्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला. हे जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे, अशी ग्रामस्थांचीही मागणी होती.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !