अहमदनगर - जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा उद्रेक झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा संसर्ग रोखायचा असेल तर सर्वाना एकत्रित येऊन प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काही कठोर निर्णय घेतले आहेत.
दि. ४ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये नागरिकांनी येण्यास मनाई करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी भोसले यांनी स्पष्ट निर्देश काढले आहेत. दि. ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधाच्या काळात नागरिकांनी शासकीय कार्यालयात येणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
मग काय करायचे ?
नागरिकांनी आपले अर्ज, तक्रार ऑनलाइन स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावे. त्यासाठी collector.ahmednagar @gmail.com या मेल आयडीवर आपल्या तक्रारी मागणीसंदर्भात अर्ज करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिका आयुक्तांनी देखील पालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये अभ्यागतांना येण्यास प्रतिबंध केला आहे. नागरिक आपल्या तक्रारी मोबाईल ॲपवर करू शकतात. नागरिकांनी गरज नसतांना घराबाहेर पडूच नये व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले आहे.
नगर जिल्हा परिषदेत देखील फक्त ५० टक्के अधिकारी आणि कर्मचारी यांना उपस्थित राहण्याचे सूचना केलेल्या आहेत. बाहेरच्या लोकांना आत येण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. काही दिवस ऑनलाईन पद्धतीने कामकाज चालणार आहे.