खळबळजनक ! मोठ्ठ हॉस्पिटल उभारणाऱ्या 'त्या' बोगस डॉक्टरला अखेर बेड्या

दोन वर्षांपासून बोगस डिग्रीच्या जोरावर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणाऱ्या एका कंम्पाउंडरला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून असे किती 'बोगस' डॉक्टर हॉस्पिटल टाकून आपला धंदा मांडून बसलेत, याची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा या डॉक्टरांचे चुकीचे उपचार रुग्णांच्या जीवावर बेतत राहतील.

शिरूर - चक्क एका कपांऊडरनेच स्वतःचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्याचा खळबळजनक प्रकार पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये नुकताच समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. 

कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरू केले होते. त्याही पुढे जाऊन त्याने थेट कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र कोव्हिड वार्ड देखील तयार केला होता, अशी माहिती आता पोलीस तपासातून समोर आली आहे. 

बोगस डिग्री, नाव बदलून प्रॅक्टिस

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. शिरूर मध्ये एक कपांऊडरच बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची गुप्त माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. 

सखोल चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचे समोर आले. पोलिसांना त्याच्याकडे एमबीबीएसचे पदवी प्रमाणपत्र देखील आढळून आले. प्रमाणपत्रावर नाव असलेले डॉ. महेश पाटील नावाची कुणीही व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये नसल्याचे समोर आले. 

पोलीस तपासात आरोपीचे मूळ नाव मेहबूब शेख असल्याचे समोर आले आहे. तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी आहे. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 

कंपाऊंडर शेख ते डॉक्टर पाटील

याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी म्हटले आहे, की प्राथमिक चौकशीत समोर आलंय की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. 

काम करत असताना त्याला असे वाटले की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी एमबीबीएसची बनावट डिग्री तयार करून नावही बदलले आणि मोरया मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले. 

महत्त्वाचे म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. त्याने बनावट डिग्री आणि आधारकार्ड कोठून मिळवले याचा तपास आम्ही करत आहोत, असेही घनवट यांनी सांगितले. 

याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरसह या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या इतर लोकांविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !