मुंबई - कोरोना संकटात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना वैद्यकीय क्षेत्रातील काही लोकांनी मात्र आपला धंदा मांडलाय. स्टॅब न तपासताच केवळ लक्षणे विचारून थेट कोरोना निगेटिव्ह अहवाल देऊन मोकळ्या होणाऱ्या मोहम्मद सलीम मोहम्मद उमर (२९) या लॅब टेक्निशियनला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्वॅब न घेताच दिले कोरोना रिपोर्ट
चारकोप पोलिसांनी अटक केलेल्या उमरने ३७ लोकांकडून १ हजार रुपये घेऊन स्वॅब न घेताच कोरोना निगेटिव्ह अहवाल दिला होता. त्यानुसार या लोकांचा शोध घेत जबाब देण्यास बोलावले. आतापर्यंत १५ जणांनी जबाब नोंदविल्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले.
मात्र, सध्या लॉकडाऊन असल्याने अन्य लोकांनी पोलीस ठाण्यात येण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पोलिसांनी आतापर्यंत ज्यांचे जबाब नोंदविले आहेत त्यात कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे उघड झालेले नाही.
उमरने ज्यांना कोरोना निगेटिव्ह अहवाल दिला, त्यापैकी कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळते का, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत. न्यायालयाने उमर ला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे देखील चारकोप पोलिसांनी सांगितले.
महिलेच्या तक्रारीवरून कारवाई
मालवणीच्या गेट क्रमांक ८ मध्ये राहणाऱ्या आणि थायरोकेअर लॅबसाठी काम करणाऱ्या उमरविरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार तिला देण्यात आलेल्या कोरोना अहवालाचा क्यूआर कोड स्कॅन केल.
तेव्हा मात्र तिला वेगळ्याच रुग्णाची माहिती त्यात उघड झाली. त्यानुसार तपासाअंती चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करून उमरची चौकशी सुरू केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.