राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. एकीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षा कशा होणार याची चर्चा सुरू आहे.
मुंबई : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. याबद्दल शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोनाच्या परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.
ट्विटद्वारे केली घोषणा
ट्वीटवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. दिवसेंदिवस राज्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. मधल्या काळात ऑफलाइन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या.
काही ठिकाणी पाचवी ते आठवी पर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या. तर काही ठिकाणी सुरू करू शकलो नाही. पण कोरोनाची परिस्थिती पाहता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे कोरोनाच्या परिस्थितीत शक्य नसल्यामुळे त्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, असेही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.