तुमचं गाव उत्तरखंडातल्या डोंगर दऱ्यांमध्ये असेल तर काय मजा येईल न..!!! इतकं सुंदर गाव सोडून जायची इच्छा होईल का हो कोणाला?? नक्कीच नाही...! पण जी माणसं तिथे राहतात त्यांचीही काही बोचरी दुःख असतात...त्यांनाही बाहेरचं जग खुणावतंच की.!!
कथेचा नायक - राहुल नेगी जो साधारण साठीला आलेला आहे. किशोरवयातच कसल्याशा भांडणावरुन गाव सोडून निघून जातो तो परत कधीच न येण्यासाठी.. परदेशात स्थायिक होतो.
पण वयाच्या मावळतीला त्याला कळतं की काही दिवसांतच त्याची दृष्टी कायमची जाणार आहे. अशावेळी त्याला पुन्हा आपल्या गावाची आठवण येते. कायमचं अंधत्व यायच्या आधी एकदातरी आपलं गाव डोळेभरुन पहावं यासाठी तब्बल ४० वर्षांनी पुन्हा गावाकडे येतो.
मनात असंख्य आठवणी साठलेल्या असतात. सोडून जाताना असलेलं गाव आणि आता ४० वर्षानंतरच गाव पार बदललेलं असतं. दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरात गावाचा चेहरामोहरा च बदललेला असतो.
केदारनाथाच्या जवळच एका साधुपुरुषाकडे राहुल नेगी राहण्याची विनंती करतो. रोज दिवसभर गावातले रस्ते धुंडाळताना जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता.
गावातल्यांना एव्हाना राहुल नेगी परत आलेल्याचं कळतं, पण ते फारसं कोणाला आवडलेलं नसतं. असाच एकेदिवशी फिरताना राहुल त्याच्या घरी जिथे त्याचा मोठा भाऊ सध्या राहत असतो तिथे पोहोचतो. लहानपणीचा राग अजूनही मोठ्या भावाच्या मनातून गेलेला नसतो.
अपमानित होऊन राहुल परत येतो. तर वाटेत त्याला गावची शाळा दिसते. तीच शाळा जिथे तो लहानपणी शिकायचा. पुरात शाळेचीही अवस्था भयंकर झालेली असते.
काश्मीरहून नवीनच शिकवायला आलेल्या मास्तरीण बाईशी आणि पुरात अख्खं कुटुंब गमावलेल्या मुन्नाशी राहुलची ओळख होते. एके दिवशी राहुलची त्याची बहीण प्रियाशी भेट होते. राहुल सोडून गेल्यानंतर घडलेलं सर्व काही प्रिया त्याला सांगते.
सगळं गाव जरी तुझ्या विरोधात असलं तरी मी तुझ्या पाठीशी होते, असं प्रिया त्याला सांगते. बहिणीच्या नातवंडांना अंघोळ घालतानाचा सीन दोघांनीही खूप कमाल सादर केलाय.
तरुणपणात राहुलचं ज्या मुलीवर प्रेम होतं, तिच्याविषयी पण प्रिया त्याला सांगते. राहुलशी लग्न न झाल्यामुळे गावाबाहेर तिला रहावं लागतं. राहुल तिलाही भेटायला जातो.
आपली दृष्टी काही दिवसांतच जाणार आहे, हे अगदी भावा बहिणीला न सांगता तिला सांगतो. पण राहुलच्या निघून जाण्याने तिच्या मनावर खोल परिणाम झालेला असतो. तिच्यापर्यंत राहुल च बोलणं पोहोचतच नाही.
गाव सोडून गेल्यानंतर आपल्यामागे राहिलेल्या माणसांना कोणत्या मानसिक अवस्थेतून जावं लागतं ह्याची जाणीव राहुलला परत आल्यानंतर होते. राहुलचा मित्र त्याची ४० वर्षं त्याला कशी साथ देतो आणि आपली निस्वार्थ मैत्री जपतो, हे खूप अप्रतिम दाखवलंय. पुरामुळे घरं वाहून गेलेली असली तरी आठवणी या तशाच असतात.
राहुल एका खालच्या जातीतल्या मुलीवर प्रेम करत असतो, हे त्या मुलीच्या वडिलांना ही मान्य नसतं म्हणून ते त्याला शाप देतात की, त्याला कायमचं अंधत्व यावं जेणेकरून पुन्हा तो कोणत्या पहाडी मुलीकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. खरतर त्याला झालेला आजार हा त्याच्या शारीरिक व्याधीमुळे होतो पण गावकरी त्याचा संबंध त्या शापाशी लावतात.
गावातल्या भावविश्वाची एकदम सुरेख मांडणी अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून दिग्दर्शकाने केलीये. सन २०१६ साली आलेला फारसा कोणाला माहित नसला तरी याला IMDb rating मात्र ७.४ आहेत.
अत्यंत कमी संवाद, लोकभाषेचा वापर, योग्य ठिकाणी वापरलेलं संगीत, चेहऱ्यावरचे नेमके हावभाव अशा अनेक गोष्टींमुळे सिनेमा मनात घर करतो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदम सुदिन.
मोठ्या कलाकारांचा समावेश नसतानाही उत्तम चित्रपट होऊ शकतो, असा आवर्जून पाहण्यासारखा सिनेमा आहे हा 'देवभूमी'.
- अनिरुद्ध तिडके (अहमदनगर)