पुणे - राज्यात काेरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी कोरोनामुळे एखादी व्यक्ती दगावल्यास त्याचा अंत्यविधी जिल्हा प्रशासन करत होते. कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून कोणाही नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपवला जात नव्हता. शुक्रवारी मात्र यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात कोरोनामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला, तर तो मृतदेह आता कुटुंबीयांना घ्यावा लागणार आहे. पुणे महानगरपालिकेने तसा नवा नियम जारी केला आहे. कोरोना रुग्णाच्या निधनानंतर मृतदेह नातेवाईकांनाच सांभाळावा लागेल, असे या नियमात म्हटले आहे.
रुग्णाचा मृत्यू घरात झाल्यास, मृतदेह प्रशासनाकडे देण्याची संपूर्ण प्रक्रिया स्वतःच पूर्ण करावी लागेल. यासाठी प्रभाग अधिकाऱ्यांच्या वतीने बॉडी बॅग आणि चार पीपीई किट नातेवाईकांना देण्यात येणार आहेत. नातेवाईकांनी ते किट घालावे आणि बॉडी बॅगमध्ये टाकावी लागेल आणि नंतर मृतदेह गाडीत ठेवावा लागेल.
प्रशासनावर वाढत असलेला ताण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अद्याप या निर्णयावर राजकीय पक्ष किंवा सामाजिक संघटना, तसेच नागरिकांमधून काही प्रतिक्रिया आलेली नाही. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ लागू होणार आहे.