शेवगाव : कोविड रुग्णांना बेड नाहीत, रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा पडलाय, ऑक्सिजनही मिळेनासा झालाय, एकूणच परिस्थिती एकदम हाताबाहेर गेलेली असून अहमदनगर जिल्ह्यात अक्षरशः हाहाकार माजलाय. परिस्थिती हाताळण्यात जिल्हा प्रशासन पूर्णपणे कुचकामी ठरल्याने ही वेळ ओढवली आहे. याची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
कमकुवत जिल्हा प्रशासन
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आवाक्याच्या बाहेर गेली असून जिल्ह्यात रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत. यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण डोळ्यासमोर पहावे लागत आहे. अनेक रूग्णांचे नातेवाईक बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन साठी दिवस रात्र वनवन करीत आहेत. या सर्व गोष्टींना प्रशासनाचा निष्काळजीपणा व चुकीचे धोरण कारणीभूत आहे.लस नियोजनाचाही अभाव
कोरोना वरील लस हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने लशीसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे घालायची वेळ आली आहे. आरोग्य प्रशासन हात वर करून मोकळे होत आहे. नागरिक मात्र लस घेण्यासाठी चकरा मारत आहेत. तसेच यासर्व गोष्टीसाठी नागरिकांची राजरोसपणे लुट सुरू आहे.
अपयशी पालकमंत्री
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यात जिल्हा प्रशासन व पालकमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. वास्तविक पालकमंत्री यांनी याबाबत प्रशासनाच्या माध्यमातून नियोजन करणे गरजेचे होते. मात्र यात त्यांनी लक्ष घातल्याचे दिसून येत नाही. नागरिकांना ऑक्सिजन, बेड, रेमडीसिव्हर वेळेत उपलब्ध करून देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. जिल्ह्यात हाहाकार माजलेला असुन याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे यांनी केली आहे.
ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर उभारा
तालुक्यातील प्रमुख ग्रामीण रूग्णालयात देखील कोविड सेंटर उभारून याठिकाणी बेडची व्यवस्था करावी. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, अशी सूचना देखील रांधवणे यांनी केली आहे.