कोरोनाच्या स्फोटक परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी 'ब्रेक द चेन' म्हणत राज्य सरकारने अखेर लोकडाऊन सुरू केले असले तरी याचे गांभीर्य मात्र शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयाला अद्याप अजिबात आलेले दिसत नाही. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या प्रतीक्षा रांगेचे (वेटिंग लिस्ट) नियोजनच न केल्यामुळे 'सोशल डिस्टन्सिंग'चा येथे पुरता फज्जा उडाल्याचे आज (ता. 14) सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत दिसून आले.
शेवगाव - येथील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या 'नियोजनशून्य' कारभारामुळे सोशल डिस्टनसिंगचा येथे पुरता फज्जा उडाला असून लसीकरण करून सुरक्षित घरी जाण्याऐवजी येथे येणारे नागरिक 'कोरोना'ग्रस्त होऊन परतण्याचीच जास्त भीती निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांचे हाल
नेमकी कुठे लस घ्यायची त्याबाबतचे मार्गदर्शक फलक कुठेही लावलेले नाहीत. त्यामुळे येथे लस घेण्यासाठी येणाऱ्यांचा पुरता गोंधळ उडत आहे. टोकन कुठून घ्यायचे, रजिस्ट्रेशन कुठे करायचे, लस कधी व कुठे घ्यायची याबाबत माहिती नसल्याने नागरिकांची अडचण होतेय.
त्यात अचानक मधूनच रजिस्ट्रेशनसाठी इकडे उभे रहा असे सांगितले जाते. त्यामुळे तासंतास पहिल्या रांगेत उभे राहिल्या नंतर मध्येच दुसऱ्या रांगेत उभे रहावे लागल्याने ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. पुन्हा पहिल्यापासून प्रोसेस सुरू होते.
आज 200 कोव्हिशिल्ड लसी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार आज सकाळी 9 वाजेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी साडेसात वाजल्यापासूनच ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. आलेल्यांना नंबरसाठीचे टोकन देण्यात आले. मात्र, रजिस्ट्रेशन यंत्रणेत आजही घोळ झाल्याने प्रत्यक्षात थेट 10 वाजता लसीकरणासाठी ची प्रक्रिया सुरू करण्यात आली. खूप संथ गतीने काम सुरू असल्याने लसीसाठी येणाऱयांची संख्या वाढत गेली तशी गर्दी वाढली.
रजिस्ट्रेशन यंत्रणेत घोळ सुरूच
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
लस घ्यायला या, अन कोरोना घेऊन जा !
घरून निरोगी येणारा माणूस येथे येऊन कोरोनाग्रस्त होऊन जाण्याचीच शक्यता वाढली आहे. या ढिसाळ कारभारामुळे ग्रामीण रुग्णालय कोरोना प्रसारासाठीचे स्फोटक ठिकाण बनू लागले आहे. येथे 'लस घ्यायला या आणि कोरोना घेऊन जा', अशी काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.
रुग्णालय कर्मचारी 'सेटिंग'मध्येच व्यस्त
डॉ. रामेश्वर काटेच्या डोळ्यात घातले अंजन, परंतु... - आज आई-वडिलांच्या लसीकरणासाठी येथे आलेले 'MBP Live24' चे संपादक ऍड. उमेश अनपट यांनी काही जबाबदार नागरिकांसह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रामेश्वर काटे यांना येथील नियोजनाचा उडालेला फज्जा दाखवून दिला. एव्हढेच नाही तर थोड्याच वेळात येथील लॅब विभागातील एक कर्मचारी बाहेरून आलेल्या ओळखीच्या लोकांना खुषकीच्या मार्गाने कसे थेट आत नेऊन तत्काळ लस देण्याचे सोपस्कार पार पाडत होता, ही बाब दाखवून दिली. तेथील कर्मचाऱ्याला समोर नेऊन त्याची ही वशिलेबाजी उघड्यावर आणून डॉ. काटे यांना दाखवून त्यांच्या डोळ्यात आज चांगलेच अंजन घातले. यावेळी बोधेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक परदेशी हे देखील कार्यालयात उपस्थित होते, हे विशेष.
तहसीलदार मॅडम, जिल्हाधिकारी साहेब यांना आवरा !
शेवगाव ग्रामीण रुग्णालयातील ढिम्म रजिस्ट्रेशन यंत्रणा, कर्मचाऱ्यांची वशिलेबाजी, सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला बोजवारा, त्यामुळे कोरोना फैलावासाठी स्फोटक बनलेले हे ठिकाण या सर्व परिस्थितीची 'याची देहा याची डोळा' अनुभूती देऊन देखील डॉ. काटे यांनी ती नियंत्रणात आणण्यासाठी कुठलीही हालचाल केली नाही. त्यामुळे यानंतर देखील परिस्थिती 'जैसे-थे'च होती.
त्यात कुठलीही सुधारणा झालेली नव्हती. ग्रामीण रुग्णालयात अधिकारी, कर्मचारी यांची एव्हढी ढिम्म यंत्रणा अस्तित्वात असेल तर आपण कोरोनाविरुद्धचे हे युद्ध जिंकणे केवळ अशक्य आहे. त्यामुळे, या यंत्रणेला भानावर आणून कोरोनाच्या धोक्याचे गांभीर्य शेवगावच्या तहसीलदार अर्चना भाकड मॅडम आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनीच लक्षात आणून द्यावे. अन्यथा ग्रामीण रुग्णालयाच्या दुर्लक्षाचा भुर्दंड शेवंगावच्या नागरिकांना भोगावा लागल्याशिवाय राहणार नाही.