शेवगाव - कोरोना संकटात सर्वसामान्य होरपळून निघत असताना शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील साखरसाम्राट, लोकप्रतिनिधी यांनी ठोस भूमिका घ्यावी, ही शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य लोकांच्या मागणीला जिल्हा काँग्रेसचे सचिव प्रा. शिवाजीराव काटे यांनी 'MBP Live24'च्या माध्यमातून वाचा फोडली आहे.
नेते गप्प का ?
सध्या राज्यात कोरोनाने हाहाकार माजवलेला आहे. शेकडो लोक मृत्युमुखी पडत आहेत. तालुक्यात हजारो कोव्हिडं बाधित रुग्णांची भर पडत आहे, असे असताना शेतकरी, कष्टकरी समाजाच्या जीवावर सहकारी संस्था उभ्या राहिल्या.
या सहकारी संस्था, कारखाने, खाजगी उद्योजक या सर्वांचे व्यवस्थापन, सर्वसामान्य जनतेच्या जीवावर निवडून आलेले सर्व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प का आहेत ? असा सवाल तालुक्यातील लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस यांची शारीरिक, मानसिक, आर्थिक हानी होत असतानाच आम्ही तालुक्याचे नेते आहोत असे म्हणणारे सर्व गप्प आहेत. याच लोकांच्या जीवावर उभे राहिलेले, गडगंज झालेले खाजगी उद्योजक, शिक्षण सम्राट देखील गप्प आहेत.
स्वतंत्र कोव्हीड सेंटर उभारावीत
या सर्वांनी वेळीच पाऊल उचलून प्रत्येक संस्थेने, कारखान्याने, उद्योजकाने, लोकप्रतिनिधींनी स्वतंत्र 1000 बेडपेक्षा जास्त क्षमता असणारी अत्याधुनिक व अल्प दरात सुविधा देणारी कोव्हिडं सेंटर उभरावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असल्याचे मत प्रा. काटे यांनी व्यक्त केले.
यावर वेळीच कार्यवाही न केल्यास तालुक्यातील जनतेच्या रोषास या सर्वांना सामोरे जावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.