मुंबई - राज्यात कोरोनाने तांडव मांडले असून रविवारी रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात विक्रमी रुग्ण संख्या वाढली आहे. एका दिवसात ५७ हजार ७४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर दुर्दैवाने २२२ जण दगावले आहेत. रविवारी २७ हजार ५०८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र अव्वल स्थानावर असताना करोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढली आहे.
राज्यात रविवारी ५७ हजार ७४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. एकट्या मुंबई पालिका क्षेत्रातच ११ हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. पुणे महापालिका हद्दीत गेल्या २४ तासांत ६ हजार ३२१ नवीन रुग्णांची भर पडली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्यात ३० एप्रिलपर्यंत वीकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.