मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मित्रपक्षांत खटके उडत असल्याचे दिसत आहे. यामागे राज्यामध्ये कोरोनाची वाढती स्थिती आणि सरकारच्या विरोधात जाणारे काही मुद्दे ही कारणे आहेत. याशिवाय संजय राऊत यांच्यावरून काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
तसेच राज्य सरकारच्या कारभारावरही काँग्रेस नाराज असल्याचे समोर येत असून काँग्रेसने ही नाराजी मुख्यमंत्र्यांसमोर बोलून दाखवली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
शरद पवार यांना युपीएने अध्यक्षपद सोपवावे, अशा प्रकारची विधाने संजय राऊत यांनी वारंवार केल्याचे दिसून येते. यावरूनच संजय राऊत यांच्या विरोधात काँग्रेसची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे.काँग्रेसच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर चर्चा झाली असून महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी यासंदर्भातील नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर बोलूनही दाखवली असल्याची माहिती मिळाली आहे.