अनेकदा वर्तमानपत्रात बालकामगार मुक्त केल्याच्या, बालविवाह थांबवल्याच्या बातम्या दिसतात. बालकांच्या हक्कासाठी आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी धडपडणारे पोपटी शर्ट घातलेले तरूण तरूणी दिसतात. तर ही यंत्रणा आहे स्नेहालय संचलित चाईल्डलाईन अर्थात बालकांना व सर्वसामान्यांना मित्र वाटणारी १०९८ ही हेल्पलाईन.
चाईल्डलाईन अहमदनगर या संस्थेला १४ एप्रिल रोजी १८ वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभुमीवर घेतलेला चाईल्डलाईनच्या कार्याचा वेध...
बालकांच्या हक्कांचे संरक्षण केले जावे यासाठी आंतरराष्ट्रीय बाल हक्क परिषदेने काही नियम घालून दिले आहेत. परंतू या नियमांचे पालन करण्यासाठी भारतात १९७४ साली राष्ट्रीय बाल धोरण जाहीर करण्यात आले. तर महाराष्ट्र सरकारने २००२ साली बालकांच्या हक्कासाठी बाल हक्क धोरण जाहीर केले. मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर बालकांचे शोषण होत असल्याचे चित्र होते.
बालकांवर होणाऱ्या अत्याचारासोबतच बालकामगार, अनाथ व निराधार बालके, बालविवाहांचे प्रमाण, बालकांना संरक्षण व निवाऱ्याची असलेली गरज, बालकांना लागणारी वैद्यकीय मदत, अमानवीय बालवाहतूक, लहान मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त करणारी टोळी यामुळे बालकांच्या हक्कांवर गदा येत होती.
पुढे हा प्रकल्प केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय स्तरावर राबवण्यास सुरूवात केली. मात्र स्नेहालय संस्था संचलित चाईल्ड लाईन अहमदनगर संस्थेने आपल्या नाविन्यपुर्ण कामाच्या पध्दतीमुळे राष्ट्रीय स्तरावर आपलं कर्तृत्व सिध्द केलं. एकविसाव्या शतकाला नुकतीच सुरूवात झाली होती. तेव्हा स्नेहालय ही संस्था अहमदनगर जिल्ह्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला, एचआयव्ही बाधित लोकांसाठी काम करत होती.
बालकांच्या समस्या सोडवण्यासोबतच त्यांना हक्काचा आधार देण्यासाठी १९९६ साली चाईल्ड लाईन फौंडेशनची स्थापना करण्यात आली आणि बालकांना निर्भयपणे आपली समस्या मांडण्यासाठी १०९८ ही हेल्पलाईनही सुरू झाली.
त्याच काळात बालकामगार, लहान मुलांना भीक मागायला लावणे, जिल्हा दुष्काळी असल्याने शिक्षणाचे अल्प प्रमाण व रूढी पंरपरा यांमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असलेले बालविवाह, बालकांवर होणारे अत्याचार, बालकांच्या पुनर्वसनाचे प्रश्न, हरवलेली बालके व लहान वयात गैरमार्गाला लागलेली बालके असे अनेक प्रश्न संस्थेच्या समोर येत होते.
आजची बालके ही उद्याचा भारत आहे. त्यामुळे या बालकांसाठी काम केलं पाहिजे. या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं पाहिजे, असा मतप्रवाह संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या मनात होता. त्याला डॉ. गिरीष कुलकर्णी यांचे पाठबळ मिळाले आणि सुरू झाला चाईल्डलाईनचा बालहक्कासाठी अविरत संघर्ष.
बऱ्याच वेळा सरकारी कामात खूप वेळ जातो मात्र संकटातल्या मुलांना मदत मिळवून देण्यासाठी १०९८ हा टोल फ्री क्रमांक फिरवला की पुढच्या काही मिनिटात चाईल्डलाईनची टीम त्याठिकाणी हजर. अशा प्रचंड वेगाने काम सुरू होते. सणवार असो, सुट्टीचा दिवस असो, वा कितीही अडचणीची वेळ असो चाईल्डलाईन टीम संकटग्रस्त बालकांसाठी कायम तत्पर असते.
गेल्या वर्षभरात चाईल्डलाईनने ६९ बालकांना निवारा, ५८ बालकांना समुपदेन व मानसिक आधार, ७० बालकांचे गैरवर्तनापासून संरक्षण, २९ हरवलेले बालके, तर कोरोना काळात १०५ बालविवाह रोखण्यात आले. तर ३२ मिळून आलेली बालके, १२ प्रायोजकत्व, ३० बालभिक्षुक, १४ बालकांना वैद्यकीय मदत केली.
कामावर असलेली प्रचंड निष्ठा हे संस्थेत काम करणारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये आहे. तर चाईल्डलाईन अनेक गुंतागुंतीचे प्रकरणेही व्यवस्थितपणे हाताळताना दिसते.
तसेच २ बालकांचे पुनर्वसन, १२ अपहरण झालेल्या बालकांना मुक्त करण्यात आले, आणि ३७ बालकामगारांना मुक्त करण्यात आले. तर कोविड संबंधी ६८ बालकांना अन्न अशा प्रकारे वर्षभरात ५३८ प्रकरणे चाईल्डलाईनने यशस्वीपणे हाताळली आहेत.
सध्या बालकामगारांचा प्रश्न गंभीर बनत आहे. कारण लहान मुलं सांगेल ते ऐकतात आणि कमी पगारात काम करतात. त्यामुळे बालमजूर कामावर ठेवण्याचे प्रमाण वाढत असताना चाईल्ड लाईन यावर अंकुश ठेवण्याचे काम करत आहे.
चाईल्डलाईनने शहरातील मिठाईवाल्याच्या दुकानातून सोडवलेला मुलगा असो वा उच्चभ्रु वस्तीतील लहान मुलाला घरकामासाठी भाड्याने आणण्याचे धक्कादायक प्रकरण चाईल्डलाईनच्या सजगतेने समोर आले आणि त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.
चाईल्ड लाईन समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्व आघाड्यांवर काम करते. पण बालकांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श काय असतो, बालकांचे हक्क काय आहेत, व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या बालकांना कसे ओळखावे, बाल कामगार, बालभिक्षुक म्हणजे काय, याबाबतची माहिती प्रशिक्षणामध्ये या मुलांना दिली जाते.
स्वसंरक्षणाचे धडे, बाल मानसशास्त्र, प्रथमोपचार प्रशिक्षण यांचेही धडे या बालमित्रांना देण्यात येतात. याशिवाय बालकांवर अन्याय होत असतील तर चाइल्ड लाइनमध्ये कसा संपर्क करावा, हेही बालकांना शिकवण्यात येते. त्यामुळे शाळेत जाताना रस्त्यावर दिसणारे बालभिक्षुक, दुकानांमध्ये-हॉटेलांमध्ये काम करणारे बालकामगार यांच्यासह बालकांसोबत होणाऱ्या वाईट गोष्टींची थेट माहिती देण्यास बालमित्र हा महत्त्वाचा दुवा बनू लागला असल्याचे चित्र आहे.
बालमित्रांच्या माध्यमातून येणाऱ्या माहितीची खातरजमा चाइल्ड लाइनचे स्वयंसेवक करतात व त्यानंतर अन्यायग्रस्त बालकाला मदत मिळवून देण्यासाठी धडपडतात. आपल्या आजूबाजूला अल्पवयिन मुलींवर लग्न लादणे, बालकामगार, बालभिक्षुक, बालकांचे लैंगिक शोषण होत असेल आणि आपण समाज म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
स्नेहालय संचलित चाईल्डलाईन अहमदनगर संस्थेने वर्षभरात ५३८ बालकांना न्याय दिला, हे चाईल्डलाईनचं मोठं यश आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर बालकांचे प्रश्न निर्माण होत असतील तर समाज म्हणून सर्वांनाच आत्मपरीक्षणाची गरज आहे. कारण बालकांचे हक्क जपता न येणं हे समाजाचे अपयश आहे.
त्यामुळे चाईल्डलाईनच्या माध्यमातून होणाऱ्या जनजागृती आणि लोकशिक्षणातून बालकांना सुरक्षित भविष्य मिळावं आणि मुलांवर होणारे अत्याचार शुन्यावर यावेत हीच अपेक्षा. स्नेहालय संचलित चाईल्डलाईन अहमदनगर संस्थेला १८ व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
- भरत दिलीप मोहळकर (अहमदनगर)