अहमदनगर - जिल्ह्यात आणि शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. तसेच मृत्यूनेही थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील पुरोहित मंडळींनी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुरोहित मंडळाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे.
अंत्यविधी व दशक्रियाविधी साठी होणाऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोना बाधित झाले आहेत. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोना बाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना बाधित असल्याची माहिती लपवत आहेत.
शहरात सध्या होणाऱ्या सर्व दशक्रिया विधी येत्या ३० एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित मंडळींनी घेतला आहे. अमरधाम येथील कुठलेही धार्मिक विधी केले जाणार नाही अशी, माहिती जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी दिली आहे.
र काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असणार आहे असे सांगतात, परंतू प्रत्यक्षात लोक गर्दी करत असतात. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहीतांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक पुरोहित आजारी आहेत.
सध्या दररोज कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव, होणारे मृत्यू व पुरोहितांची सुरक्षितता आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने ३० एप्रिल पर्यंत अमरधाम मध्ये कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नाही असा सर्वानुमते निर्णय घेतला आहे.