मुंबई - ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रजनीकांत यांच्यावर महाराष्टाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही फिदा आहेत. नुकतेच अजित पवार यांनी रजनीकांत यांचे तोंड भरुन काैतुक केले आहे. याला निमित्तही तसेच आहे. रजनीकांत यांचा चाहता नसलेला सिनेप्रेमी सापडणे विरळच. त्यामुळे पवार यांनी रजनीकांत यांचे कौतुक करणे साहजिक असले तरी विशेष मात्र आहे.
कारण रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणाले की, रजनीकांत यांनी त्यांच्या शैलीदार अभिनयानं भारतीय चित्रपटसृष्टी कसदार, समृद्ध बनवली.
चित्रपटाच्या पडद्यावर कल्पनेपलीकडचा ‘महानायक’ रजनीकांत यांनी सादर केला. अभिनयाच्या बळावर ‘अशक्य ते शक्य’ करुन दाखवलं. चित्रपटांतच नव्हे तर, जनमनातही ते ‘महानायक’ ठरले आहेत.
भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचणाऱ्या स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर होणं आणि या दोघा चित्रकर्मींचं ‘मराठी’ असणं ही आनंदाची, अभिमानाची, गौरवाची बाब आहे. मी रजनीकांत यांचं मनापासून अभिनंदन करतो, असे पवार म्हणाले.
रजनीकांत यांचा अभिनय व व्यक्तिमत्वाचं गारुड चित्रपट रसिकांच्या मनावर चिरंतन राहील, असा विश्वास व्यक्त करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी रजनीकांत यांना शुभेच्छा दिल्या आहेत.