यशस्विनी महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची हत्या झाली तेंव्हापासून हे प्रकरण विविध वळणाहून जात आहे.
शेवगाव - गळा चिरून हत्या करण्यात आलेल्या रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी आता पोलिस संरक्षणात वाढ करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांना आहे.रुणाल जरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की पोलिसांना मला स्वत:ला दिलेले पोलिस संरक्षण वाढवून मिळावे, तसेच आणखी एक पोलिस कुटुंबियांकरीता नियुक्त करावा. जरे हत्याकांड प्रकरणी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्याविरुद्ध पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणे बाकी आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षकांनी मला स्वत:ला पोलिस संरक्षण दिले होते.
माझ्यासह कुटूंबीय धोक्यात
बोठे यास अटक झाल्यानंतर माझे पोलिस संरक्षण कमी करण्यात आले. आता एकच पोलिस संरक्षणासाठी देण्यात आलेला आहे. माझ्या कुटूंबियावर सध्या भितीचे सावट आहे.
मला केससंदर्भात बाहेर पडावे लागत आहे. आरोपी मला व माझ्या कुटूंबियांना संपवून टाकू शकतो. म्हणून पोलिस संरक्षणात वाढ करावी, अशी मागणी जरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या हत्याकांडाचा मास्टरमाईंड आरोपी बाळ बोठे सध्या पारनेर जेलमध्ये आहे. या पकरणात अटक झाल्यानंतर त्याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल एका विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
बोठे पारनेर जेलमध्ये
नंतर तोफखाना पोलीस ठाण्यातील खंडणीच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. आता बोठेची तुरुंगात रवानगी करण्यात आली असून तो पारनेर पोलीस ठाण्यात तुरुंगात आहे.