अहमदनगर - राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर याचे अपहरण करून हत्या केल्या प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
गुप्त खबऱ्याकडून मिळालेली माहिती व तांत्रीक तपासामध्ये या गुन्ह्यातील आरोपीचा राहूरी, शिर्डी, कोपरगांव, येवला, निफाड या परिसरात शोध घेवून आरोपी लाल्या उर्फ अर्जून विक्रम माळी (वय- २५ वर्षे, रा. जूने बस स्टैंड जवळ, एकलव्य वसाहत, राहूरी), तौफीक मुक्तार शेख (वय-२१ वर्षे, रा. राहूरी फॅक्टरी, ता. राहूरी) यांना शेरी (राहूरी, अहमदनगर) व चिखलठाण (निफाड, नाशिक), अशा ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.
मंगळवारी (ता ०६) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्रकार रोहीदास राधूजी दातीर (रा. उंडे वस्ती, मल्हारवाडी रोड, राहूरी) हे एक्सेस स्कूटी (गाडी नं. एमएच-१२-जेएच-४०६३) वरुन राहूरी येथून मल्हारवाडी रोडने घरी जाताना अज्ञात आरोपींनी बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ जिपमध्ये बसवून त्यांचे अपरहण केले होते.
या घटनेबाबत पत्नी सविता रोहीदास दातीर (वय- ३९ वर्षे, रा. उंडे वस्ती, मल्हारवाडी रोड, राहुरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा राहूरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यानंतर दातीर यांचा मृतदेह सापडल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षकांनी ओळखले गांभीर्य
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन आरोपींना जेरबंद करण्यासाठी स्वतंत्र पथके नेमण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सुचना दिल्या होत्या.
एलसीबी, राहुरी पोलीस पथक
पोलीस निरीक्षक कटके व राहुरीचे पोलिस निरीक्षक दुधाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मिथून घुगे, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू घोडेचौर, मनोहर गोसावी, पोलीस नायक सुरेश माळी, सचिन आडबल, विशाल दळवी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश पाथरुट, शिवाजी ढाकणे, रोहीत येमूल, आकाश काळे पोलिस नायक फूरकान शेख, चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल बबन बेरड, उमाकांत गावडे यांचे तसेच राहुरीचे स्वतंत्र पथक नेमून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली.
दोघे सराईत फरार
आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत हा गुन्हा त्यांचे साथीदार कान्हू मोरे ( रा. वांबोरी, ता. राहूरी) व अक्षय कुलथे (रा. राहूरी) यांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यानुसार आरोपींचा शोध घेतला जात आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी राहूरी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून तपास सुरू आहे.
यांनी केला तपास
या गुन्ह्याचा तपास अपर पोलीस अधीक्षक सौरभ कूमार अग्रवाल, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके, संगमनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल मदने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकूमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद मेढे, अजिनाथ पाखरे यांनी केला.