बाटलेला 'स्टेथो', अन कोंडलेला श्वास..

ऍड. उमेश अनपट -

अष्मयुगातील मानव आणि आधुनिक युगात मनुष्य यांच्यात फार मोठी तफावत आहे. या दोन टोकांच्या मधील उत्क्रांतीचा, जडणघडणीचा प्रवास अनेक चढउतारांचा. आपल्या देशाचा विचार केल्यास 'साहेब' म्हणजेच इंग्रज आपल्याकडे येण्यापूर्वीचा 'भारत' आणि आताचा 'इंडिया' यात देखील विविध क्षेत्रात अनेक अंगांनी बदल घडले आणि घडत आहेत. 

या बदलाच्या प्रवासात मानवी जीवनाला 'जगणं' देणारा श्वास कायम ठेवण्यासाठीचं वैद्यक शास्त्र देखील अनेक वळणांना वेढे घालून पुढे जातंय. पूर्वीच्या राजेरजवाडे यांच्या काळातील वैद्य इंग्रज शासनानंतर डॉक्टरच्या रूपाने पुढे आला. वैद्याचे नाडी परीक्षण ते डॉक्टरची 'ट्रीटमेंट' यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. 

तसेच वैद्यकीय 'सेवा' ते डॉक्टर चा हॉस्पिटल रुपी 'धंदा' हे विलक्षण वेगवेगळे चेहरे आहेत. डॉक्टरने छातीवर स्टेथोस्कोप ठेवला आणि मानवजातीचा श्वास कधी कोंडला हे कळलेच नाही. अर्थात यालाही अपवाद आहेत. मात्र, हे अपवादरूपी डॉक्टर सुक्ष्मदर्शकाने शोधूनही सहजासहजी सापडत नाहीत.

वैद्यकीय 'सेवे'ला डॉक्टर च्या 'धंद्या'त रूपांतरित करणाऱ्या काही महाभागांमुळे मानवी ह्रदयाचा ठाव घेणाऱ्या स्टेथोस्कोपमुळे आता मात्र रुग्ण श्वास कोंडून अक्षरशः गुदमरू लागलेत. आजाराच्या संकटातून उपचाराच्या माध्यमातून आपली सोडवणूक व्हावी म्हणून रुग्ण डॉक्टर कडे येतात. 

मात्र, पैशांच्या हव्यासात 'प्रॅक्टिस' मध्ये गुंतलेल्या 'डॉक्टर'ला श्वास कोंडून गुदमरणाऱ्या रुग्णांच्या ह्रदयाचे ठोके स्टेथोस्कोप लावूनही ऐकू येईनात. एव्हढी भयाण, निर्दयी परिस्थिती सध्या निर्माण झालेली पहावयास, प्रत्यक्ष अनुभवास मिळत आहे, अगदी प्रत्येकाला. 

अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीच्या भयाण संकटातही 'धंदा' मांडलेल्या काही डॉक्टरच्या राक्षसी प्रवृत्तीपुढे मनुष्य जीवनाचे मोलच उरलेले नाही. आजारपणाच्या वेदनेने विव्हळणारा पेशंट पाहून धंदेवाईक असणाऱ्या डॉक्टरांच्या ह्रदयात 'दर्द' होत नाही ही मोठी शोकांतिकाच. 

पेशंटच्या रोगावर निदान करण्यासाठी आपली बुद्धी कामाला लावण्याऐवजी आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंट च्या आर्थिक परिस्थितीचे आडाखे बांधून हा किती 'कमाई' देईल याचे आर्थिक गणित मांडण्यात डॉक्टर चे डोके गुंतून जाते. 

मॅनेजमेंटमध्ये गुंतलेल्या डॉक्टरला पेशंट च्या रोगाचा ठाव लागत नाही. त्यामुळे डॉक्टरच्या बिलाचा आकडा उकळत्या पाण्यात ठेवलेल्या तापमापीतील पाऱ्याप्रमाणे वेगाने वर वर आणि वरच जात राहतो. मात्र, या सगळ्या चक्रात पेशंटचा श्वास गुदमरून त्याचा कारडीओग्राफ वेगाने खाली-वर होऊन डॉक्टर समोर तो जीवाला मुकतो. 

कर्ता पुरुष असेल तर त्याच कुटूंब उघड्यावर येत. कोणाची आई, बाप, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा अशी जवळची माणसं डोळ्यादेखत जगाचा आणि त्यांचा निरोप घेताय याच्याशी 'मॅनेजमेंट गुरू' बनलेल्या डॉक्टर ला काही देणंघेणं राहात नाही. 

कारण, त्याने बांधलेल्या आडाख्या प्रमाणे सर्वकाही घडलेले असते आणि त्याच्या तिजोरीत 'कमाई' जमा झालेली असते. अगदी त्या पेशंटकडून कमवायची ठरवलेली असते तेव्हढीच किंबहुना थोडीशी जास्तच. या राक्षसांची तिजोरी भरण्यासाठी एक 'व्यक्ती' हकनाक बळी जातो, को जो कोणाची आई, बाप, बायको, नवरा, मुलगा, मुलगी, आजी, आजोबा, काका, काकू असतो.

डॉक्टरची तिजोरी भरूनही पेशंट च्या कुटूंबियांचे हात मात्र रिकामेच राहतात. मात्र, खांद्यावर असते आपल्या जिवलग व्यक्तीच्या प्रेताचे ओझे, डोळ्यातुन खळखळत वाहणारे पाणी आणि आपल्या जिवलग व्यक्तीच्या जाण्याचे अतीव दुःख.

आता बस्स..! मनुष्याच्या आजारपणावर पोसणारा हा कॉर्पोरेट हॉस्पिटलनी मांडलेला लुटारूचा आक्राळविक्राळ बाजार उठवायलाच हवा. त्यासाठी आपण बोलते व्हायला हवं. आपली वेदना मांडा. 

केवळ पैशांच्या हव्यासापायी आपल्या जिवलग व्यक्तीला  यमसदनी धाडणाऱ्या वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या जल्लादाना फासावर लटकविण्यासाठी पुढे या. त्यांची 'कृष्णकृत्य' जगासमोर आणून कायद्याच्या हवाली करा. 

- लेखक 'एमबीपी लाईव्ह 24' चे मुख्य संपादक आहेत. 

उद्या वाचा : आयुर्वेदिक 'बेडका'ची ऍलिओपॅथीक 'उडी'

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !