अकरावी, इतर अभ्यासक्रमांच्या शाखांच्या प्रवेश प्रक्रिया 'अशी' राबविणार?

राज्यातील विविध प्राचार्यांसोबत सोमवारी झालेल्या बैठकीत राज्य मंडळ व इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी गुणांच्या समानीकरणासाठी प्रक्रियेत काही बदल केले जाऊ शकतात का? विद्यार्थ्यांची एकच प्रवेश प्रक्रिया घेतली जाऊ शकते का? अशा विविध पर्यायावर चर्चा झाली.



मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या तरी पुढील अकरावी आणि इतर अभ्यासक्रमांच्या शाखांच्या प्रवेश प्रक्रियेचा समतोल कसा साधायचा, हे राज्य शिक्षण मंडळापुढील मोठे आव्हान आहे. यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तज्ज्ञ, विविध विषयांतील व मंडळातील अभ्यासक. तसेच राज्याच्या विविध भागांतील महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी यांच्यासोबत बैठका सुरू केल्या आहेत.

विद्यार्थिहिताचा अंतिम निर्णय
राज्यातील अनेक नामवंत महाविद्यालयांतील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षण मंडळातील अधिकारी या बैठकीला हजर होते. या बैठकीत अकरावी प्रवेशाच्या विविध पर्यायांवर तज्ज्ञ मंडळी व अभ्यासकांची मते व पर्याय जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षणमंत्र्यांनी केला. या सर्व पर्याय व उपायांवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय होऊनच विद्यार्थिहिताचा अंतिम निर्णय दहावीनंतरच्या पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येईल, असे समजते.

१७ लाखाहून अधिक विद्यार्थी
यंदा राज्य मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणारे १६ लाख विद्यार्थी आणि इतर मंडळांचे विद्यार्थी असे जवळपास तब्बल १७ लाखाहून अधिक विद्यार्थी पुढच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील. आधीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नामवंत महाविद्यालयांतील प्रवेशासाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी स्पर्धा करावी लागते. त्यामुळे अकरावी व इतर प्रवेश कसे आणि कोणत्या निकषांवर करायचे, यासाठी विविध पर्यायांची चाचपणी शिक्षण विभाग करत आहे.


या पर्यायांचा विचार होऊ शकतो


- अंतर्गत मूल्यमापन करताना सीबीएसई, आयसीएसई मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाचे निकष बघून राज्यातील मंडळाच्या विद्यार्थ्यांना गुण देऊन उत्तीर्ण करून अकरावी प्रवेश गुणांच्या आधारे दिला जाऊ शकतो.

-राज्य मंडळाच्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांमध्ये समानता आणण्यासाठी बहुपर्यायी परीक्षा घेऊन अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय विचारत घेतला जाऊ शकतो.

-आठवी, नववी आणि दहावी संयुक्त मूल्यपामन करून अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल दिला जाऊ शकतो. याच निकालाच्या आधारावर पुढील अकरावीसह इतर प्रवेश प्रक्रियांमध्ये विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, असा पर्यायही विचाराधीन आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !