गरुडभरारी घ्या, तुमच्या पंखांना बळ देण्याचे काम आमचे..

मुंबई - कोरोनाच्या संकटकाळात राज्यातील बचतगटांच्या महिलांनी १ कोटीहून अधिक मास्कचे उत्पादन करुन कोरोनाविरोधातील लढ्यात सहभाग दिला. आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचतगटांच्या महिला अशा सर्व माता – भगिनींनी या काळात शौर्य गाजविले. या माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील. तुम्ही गरुड भरारी घ्या, तुमच्या पंखांमध्ये बळ देण्याचे काम शासन करेल, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रोत्साहन दिले.

राज्यातील बचतगटातील सुमारे १ लाख महिलांशी संवाद साधला. ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) ते ५ जून या पर्यावरण दिनापर्यंत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ राबविण्यात येणार आहे

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर वेबलिंकद्वारे बचतगटांच्या सुमारे १ लाख महिला सहभागी झाल्या होत्या.

जिल्ह्यात उत्पादित होणारी विशेष उत्पादने लक्षात घेऊन बचतगटांनी त्यांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत करावे. या उत्पादनांना आपण राज्य, देश आणि जागतिक पातळीवर मार्केट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु. सध्या सेंद्रीय उत्पादनांना शहरांमध्ये मोठी मागणी आहे. 

‘शेत दोघांचे, घर दोघांचे’ उपक्रमातून मालमत्तेवर महिलेचेही नाव असावे याला चालना देण्यात येईल. महिलांमधील तंबाखुमुक्ती, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती यासाठी मोठी जनजागृती केली जाईल. महिलांच्या आरोग्य रक्षणासाठी त्यांचे हिमोग्लोबीन व बीएमआय तपासणी करुन त्यांना पोषणाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल. 

कौटुंबिक हिंसाचार रोखणे व महिलांना कायदेविषयक सहाय्य व सल्ला देण्याबाबत उपक्रम राबविण्यात येईल. पुढील ३ महिने अशा विविध उपक्रमांमधून महिलांचा सर्व क्षेत्रात सहभाग वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येतील. सर्वांनी अभियानात सहभाग घेऊन ते यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

९२ ७० २५१ ८७८ हा मोबाईल क्रमांक तुमच्या Whats App ग्रुपमध्ये समाविष्ट करा आणि मिळवा ताज्या बातम्या 

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !