नागपूर - शहरात एका पत्नीने नातेवाइकांच्या मदतीने पती व सासूवरच हल्ला केला. ही खळबळजनक घटना कपिलनगरमधील संयोगनगर येथे घडली आहे. प्रमित युवराज वालमंडे (वय ३२) व त्याची आई अशी जखमींची नावे आहेत.
कौटुंबिक वादातून पत्नीने नातेवाइकांच्या मदतीने पती व सासूवर हल्ला केला आहे. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी प्रमितची पत्नी स्नेहा वालमंडे, विनोद कवडुजी बागडे, कल्पना विनोद बागडे, राहुल विनोद बागडे, प्रियंका, चंचल अजय ठाकूर, बाप्या ऊर्फ दुर्गेश रत्नाकर टिटे, मंदिल रामकृष्ण सवाईथूल यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला.
पोलिसांनी पत्नीविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. स्नेहा व प्रमितमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. स्नेहाच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रमितविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे.
फिर्यादीत म्हटल्यानुसार दि. ७ मार्चला स्नेहा व तिचे नातेवाईक प्रमितच्या घरात घुसले. त्यांच्या हातात शस्त्रे होती. नातेवाइकांनी प्रमित व त्याच्या आईला मारहाण केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.