यंदाही 'महिला 'दिन' थाटात साजरा होईलच. पण....

दिनांक ८ मार्च १९०८ न्युर्याकमध्ये वस्त्रोद्योगातील स्त्री कामगारांनी पहिले आंदोलन करत ऐतिहासिक निदर्शने केली. कामाचे ठराविक तास, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी ही निदर्शने होती. या दोन मागण्यांबरोबर मतदानाच्या हक्काचीही मागणी करण्यात आली... 

सन १९१० साली झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्ती क्लारा झेटकीन हिने कोपनहेगन इथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत १९०८ च्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून साजरा करावा, असा ठराव पास केला.


समान अधिकारासाठी सुरु झालेल्या संघर्षाच्या या लढाईतून 'महिला दिना'ची कल्पना पुढे आली. दि. ८ मार्च १९१७ या दिवशी रशियातील महिलांनी अन्न आणि कपडे या मूलभूत अधिकारासाठी संप पुकारला होता. झारशाहीच्या अस्तानंतर रशियातील महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे १९७५ ला युनोने विश्वातील विविध देशातील कष्टकरी महिलांनी केलेल्या संघर्षाची दखल घेऊन दि. ८ मार्च हा दिवस 'जागतिक महिला दिन' घोषित करण्यात आला.
       
पण तेव्हापासून आजपर्यंत सुरु असलेला हा 'समान अधिकारा'साठी केलेल्या संघर्षाचा 'गाभा' हरवत चालला आहे. 'समते'साठी स्त्रीचा लढा अजूनही चालू आहेच. महिला दिन साजरा करताना आपल्या देशात कमालीची 'विसंगती' आणि 'विरोधाभास' आढळतो. हा विरोधाभास यासाठी की 'स्वयंघोषित संस्कृतीरक्षक' अजूनही स्त्री प्रवेशाने मंदिर बाटते, तिने पाश्चात्य कपडे घातले की संस्कृती बिघडते... असा टाहो फोडताना दिसतात.
    
अजूनही देशात काही ठिकाणी तिने शृंगार करावा की नाही, स्वयंपाक कसा करावा, आमच्याच घरची पध्दत पुढे गेली पाहिजे, असा आग्रह धरतात. किंबहुना तशी 'सक्ती'च असते. कितीतरी घरात सुशिक्षित स्त्रीयाही 'रुम सर्व्हिस' देताना दिसतात. ही गोष्ट घरातील सदस्याच्या सवयीची होते. मग नंतर तिच वय वाढलं, जबाबदारी वाढल्यामुळे तिने काही काम केली नाहीत, तर घरातले लोक तिच्यावर चिडतात. अन स्वतःच्या घरात हे 'दुय्यमत्व' जपणारे लोक दुसऱ्या, 'बाहेरच्या' स्त्रीयांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत असतात. ह्यापेक्षा 'विरोधाभास' काय असेल ?
  
स्त्रीला स्वतःला स्वतःचे स्वप्नं पहायचा असा काहीही अधिकार नाही. स्वप्नं पुरुषांनी पहावी, आपल्या कर्तृत्वाने ती पूर्ण करावी. याला 'पुरुषार्थ' म्हणतात. असंच आजवर चालत आलंय. पण मग असा 'स्त्रीयार्थ' का बरं नसावा ??
   
तीने कितीही मोठ्या पदावर काम करावं, पण घरी दमून आल्यावर स्वयंपाकघरात जाऊन सांग्रसंगीत स्वयंपाक करायचाच. कारण तिला नोकरी करायचं स्वातंत्र्य दिलय ना.. मग 'शाब्बास सुनबाईचा' रोल निभवायला हवाच, असं सासरच्यांनाच काय माहेरच्यांनाही वाटत असतं बरं मंडळी..!
   
'सुलू' नावाच्या सिनेमात विद्या बालनने एका गृहिणीचा अभिनय केला होता. साधीशी गृहिणी पण 'आरजे' बनते. पण तिच्या या नोकरीमुळे तिचं सारं कुंटूब विरोधात जाते. तेव्हा ती खंबीरपणे 'संवादाने' प्रश्न सोडवून ती पुन्हा नोकरीवर रुजू होते. पण हे वास्तव जीवनात घडते का हो ? तिला बोलू दिलं जात का ? हाही मुद्दा अभ्यास करण्यासारखाआहेच...!

आता करिअर करता करता घर, मुले सांभाळणे मुली करत आहेत. पण या दगदगीमुळे मुलींच्या तब्येतीवर परिणाम होतो. तिच्या स्वभावावर होतो. लग्नाच्या आधी स्वप्नं पाहणारी, एक भावनाशील मुलगी तिचं रुपांतर सहन करुन करुन एका कर्कश बाईमध्ये होतं. वरून याचा दोष पूर्णतः तिलाच दिला जातो. म्हणून मुलांनीही आता घरकाम, बालसंगोपन यात पत्नीला मदत करण्यात कमी पडता नये. किंवा 'फुकाचा पुरुषी अंहकार' पतिपत्नीच्या मध्ये येता कामा नये.

परिवर्तन ही काळाची गरज आहे, ती आपण स्विकारायला हवी. मुलग्याला किंवा मुलीला उच्च शिक्षण द्यायला हवेच. पण त्याबरोबरच घरकाम, जरुरी स्वयंपाक आलाच पाहिजे, हे पालकांनी लक्षात ठेवायला हवं. मुलगा रडायला लागला की घरातील मोठे म्हणतात,"ए रडतोस काय मुलींसारखा..!" इथे आपण दुःख व्यक्त करण्याची नैसर्गिक भावना दाबून टाकण्याचे चुकीचे शिक्षण देत असतो. मग रडायचं ते मुलींनी आणि रडवायचं ते 'मुलींनाच' अशी विकृत भावना असलेल्या पुरुषाचा जन्म होत असतो.
    
स्त्रीचं शारारिक कमकुवतपण हे छळण्यासाठी आहे हे आपण मुलांना शिकवतो, आणि मुलींना तुम्ही सहनच करायला पाहिजे, अशी शिकवण देत असतो. पुरुषसत्ताक पध्दतीने वाढीला लावलेली स्त्री ही 'उपभोगा'ची वस्तू आहे. ही भावना पुरुषांच्या मनात ठाम बसलेली असते. लैंगिक सुख हे स्त्रीकडून 'ओरबाडून' घेणं, हा जणू स्वतःचा 'हक्क' आहे, असच वाटून काही विकृत पुरुष तिच्यावर जबरदस्ती करतात. बलात्कारी पुरुषांच्या मानसिकतेचा अभ्यास केला तर त्यामध्ये त्यांच्या लहानपणापासूनच झालेली वाढ, त्यांच्या सभोवतालची परिस्थितीच कारणीभूत असते.

महिला दिनाचा जन्मच मुळी स्त्रीयांनी त्यांचे अधिकार मागण्यासाठी केला होता, हेच 'पुरुष'सत्ताक पध्दती विसरते आहे. अपेक्षांचे नेहमीच ओझे होते स्विकारणं हे सुखाच असतं, पण तिनं ते प्रेमानं आपल्या मर्जीने करायला हवं. स्त्रीच्या शरिरापलीकडे जाऊन तिला माणूस म्हणून पाहिलं जाण्याची गरज आहे. केवळ सत्ता आहे, बळ आहे, म्हणून स्त्रीला 'गृहीत धरणं' बंद व्हायला हवं.

बलात्काराच्या केसेसमध्ये जलद न्यायप्रक्रिया व्हायला हवी. निकाल, कडक शिक्षा व्हायला हव्यात. तरच समाजातील अशा विकृत घटकांवर जरब बसेल. कारण वर्षानुवर्षे समजावून सांगून समाजाला जर कळत नसेल, तर अशा जरब देणाऱ्या शिक्षेने तरी अशा विकृतांना भिती वाटेल.

प्रसिध्द फ्रेंच लेखिका सिमाॕन द बोव्हा म्हणते, 'बाई' म्हणून कुणीही जन्म घेत नसते तर तिला 'बाई' बनविले जाते. मी तर यापुढं जाऊन म्हणेन की, "समाज बाईला फक्त शरीराच्या परिघात 'जाणिवपूर्वक' अडकवून ठेवतो". यासाठी तिच्या 'माणूस' असण्याच्या जाणिवा प्रखर होणं महत्वाचे आहे.!

बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, गुलामाला आपण गुलाम आहोत हे समजणं म्हणजेच त्याच्या माणूसपणाच्या जाणिवेची सुरवात...!
  
स्त्री-पुरुष हे एकमेकांना 'पुरक' आहेत, पण पुरुषसत्ताक पध्दतीने त्यांना 'स्पर्धक' बनवले आहे. पुरुष श्रेष्ठ आणि स्त्री कनिष्ठ... पुरुष हा 'जेता' आणि स्त्री ही 'जीत' हे शिक्कामोर्तब केलं. अर्थातच यंदाही महिला दिन थाटात साजरा होईल. मग पुन्हाः महिलांवर अत्याचार, बलात्कार होत राहतील. महिलांची टिंगल करणारे 'जोक्स' पुन्हा पुन्हा 'फॉरवर्ड फॉरवर्ड' करण्याचा खेळ लोक चवीने खेळतील.

अर्थात सारचं कांही बिघडलयं असं नाही. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आलीय. स्त्रीया बोलू लागल्यात. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरुप बदलत गेले आहे. खेड्यापाड्यातील स्त्रीचा सुर्योदय व्हायचा बाकी आहे. अर्थातच लढाई अजूनही बाकी आहे. स्त्री आपली 'स्पर्धक' नाही, 'पुरक' आहे हे पुरुषसत्ताक पध्दतीच्या जेव्हा लक्षात येईल, तेव्हाचं घराघरात नंदनवन होईल.

सर्व सख्यांना शुभास्ते पंथान संतु !

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)
संपादक - सखीसंपदा
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !