सामाजिक, संवेदनशील विषयांवर, तसेच अन्यायविरुद्ध उभे राहण्यासाठी आंदोलने होणे, हे लोकशाही राज्यात राहणाऱ्या लोकांच्या जागरुकतेचे दर्शन घडवणारे चित्र आहे. पण प्रसिद्धीसाठी कोणत्याही विषयावर आंदोलन केले म्हणजे तुम्ही लोकांच्या प्रश्नांवर संवेदनशील असालच असे नाही. काही चमकोगिरी करणारे उदयोन्मुख नेते अशांपैकीच..
याची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्र्यांनी परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करावी लागल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच एक आठवड्याच्या आत ही परीक्षा घेण्याचा शब्दही उमेदवारांना दिला. तोपर्यंत या विषयावरुन अगदी आघाडी सरकारमध्ये असलेल्या मित्र पक्षांनीही मुख्यमंत्र्यांची काेंडी केली.
नगरमध्येही परीक्षा रद्द झाल्यामुळे उमेदवार रस्त्यावर आले. दिल्लीगेट परीसरात त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. ही बाब समजताच एका मोठ्या राजकीय पक्षाचा उदयोन्मुख पदाधिकारी देखील त्यांच्यात सामील झाला. अर्थात त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही तोवर सरकारविरोधी प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या.
त्यामुळे हे पदाधिकारी महाशय देखील अचानकपणे रस्त्यावर आले. त्यांनीही रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेल्या उमेदवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले की शहरात जमावबंदी आदेश लागू आहेत. त्यामुळे ते तत्काळ तेथून सटकले देखील.
शिवाय त्यांचा कार्यभाग सुद्धा उरकलेला होता. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केल्याचा पुरावा म्हणून त्यांचे फोटोसेशन देखील पार पडलेले होते. त्यामुळे ते जितक्या त्वरेने तेथून उठून अंतर्धान पावले, तितक्याच त्वरेने त्यांच्या पक्षाच्या पुढाकाराने शहरात आंदोलन झाल्याच्या वार्ता माध्यमांपर्यंत पद्धतशीपणे पोचल्या.
थोड्या वेळाने नजिकच्या पोलिस ठाण्यातील पोलिस आले आणि त्यांनी रस्त्यावर बसलेल्या उमेदवारांना गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेले. आता मात्र उमेदवारांची गोची झाली. संतप्त होऊन ते रस्त्यावर उतरले खरे पण आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले की काय, अशी भीती त्यांना वाटू लागली.
मग त्यांच्यात चर्चा सुरु झाली की ते मघाशी आलेले राजकीय पक्षाचे प्रतिनिधी कोण होते, त्यांना बोलवा, ते आपल्यासाठी आले होते ना, त्यांना आपल्या मदतीसाठी पाचारण करा.. पण त्या चमकोगिरी करणाऱ्या प्रतिनिधीला चांगलेच जाणून असलेल्या एका पोलिसाने सांगितले की त्याचे काम झाले, तो आता येत नसतो.
आता मात्र विद्यार्थ्यांचा संताप आणखीनच अनावर झाला. आला तर आला, अन वर स्वत:चीच प्रसिद्धी करुन गेला, अशा शब्दात विद्यार्थी त्याच्याविषयी राग व्यक्त करु लागले. त्या विद्यार्थ्यांचं पुढे काय झालं ते झालं असेलंच. पण या पठ्ठ्याचं काम मात्र उरकलं होतं ना..
आता पुन्हा असाच कोणत्यातरी आंदाेलनात तो पुन्हा नगरकरांना रस्त्यावर उतरलेला दिसेल.. पण तोपर्यंत तरी हे विद्यार्थी मनातल्या मनात म्हणत असणार...
'कहा से आया था वो, कहाँ गया उसे ढुंढो..'