कोरोनाबाबत अनेक मतप्रवाह आहेत. असू दे. त्याला माझी हरकत नाही. काय बोलायचे ते बोला, लिहायचे ते लिहा. मात्र गेल्या दोन दिवसांत माझ्या परिचयातील चौघेजण हे जग सोडून गेले. कारण कोरोना. त्यातले एक गृहस्थ ऐन पन्नाशीतले. तरतरीत होते. मैदानावर चालायला येणारे. अगदी धट्टेकट्टे. बघता बघता एकामागून एकेक करत लोक निघून गेले..
एक वरिष्ठ पत्रकार मित्र दवाखान्यात उपचार घेत आहेत. त्यांची फेसबुक पोस्ट मन हेलावून टाकणारी आहे. एका पोझिटीव्ह नातेवाईकाची मानसिक स्थिती गंभीर बनली होती. आता बाहेर पडले आहेत. चिता पेटवलेली स्मशाने बघून काळजाला घरं पडतात. तरीही अनेकजण कोरोनाला हलक्यात घेतात.
यावर राग व्यक्त करावा की संबंधित महानुभवांची कीव करावी हे कळत नाही. प्रचंड संख्येने पेशंट वाढत आहेत. पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट जास्त भयानक आणि नुकसानकारक दिसते. जास्त सजगता आवश्यक आहे. निष्काळजी पणाची जबरदस्त किंमत मोजायला लागेल.
मी विनाकारण घर सोडत नाही. बाहेर पडताना मास्क लावून निघतो. कुठं बसत नाही. कोणाच्या शक्यतो कोणाच्या हातात हात देत नाही, घेत नाही. अंतर राखतो. वस्तू-व्यक्ती यांना अनावश्यक स्पर्श टाळतो. डायट नीट घेतो. गेल्या वर्षभरात मी मोजून पाच-सहा घरांत गेलो असेन.
उगीच प्रवास करत नाही. बिनकामाचं कोणाला भेटत नाही. जन्मदिवस, लग्नं समारंभ, अंत्यविधी, दहावे इथे गर्दीत जायचं शक्यतो टाळतो. ‘मी मास्क वापरणार नाही‘ असल्या फालतू वल्गना करणाऱ्या लोकांच्या प्रभावाखाली कृपया येऊ नका. एकदा वेळ आली की स्वतःला निस्तरायला लागतात गोष्टी.
बोलघेवडे लोक तेव्हा सोबत नसतात. लस टोचून घ्यावी. अंतर ठेवा, मास्क वापरा, डायट नीट ठेवा, नियमित व्यायाम, योगा, प्राणायाम करा. 'मास्क है जरुरी, ना समझो इसे मजबुरी'. फिरायला तरी बाहेर पडा. बाहेर पडता येत नाही.
स्नेहीजणांना भेटता, बोलता येत नाहीये. त्यामुळे आनंदी वृत्तीचा निर्देशांक खालावला आहे. त्यामुळं मानसिक स्वास्थ्य सांभाळा. त्यासाठी आवश्यक तेवढी काळजी घेऊन ट्रेकिंग, स्विमिंग, जॉगिंग, सायकलिंग अशा गोष्टी आणि व्यायामाची मदत होते.
तसेच संगीत ऐकणे, आवडीचे छंद जोपासणे महत्त्वाचे. एकदा कोरोना झाला की पिळवटून काढतो. पेशंट वाढत आहेत. दवाखान्यात खाटा मिळत नाहीयेत. पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नाहीये. लाखांत खर्च होतो. कुटुंबाची मोठी परवड होते.
ज्यांच्यावर बितते त्यांनाच कळते. त्यामुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणं आपली स्वतःची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा हा जन्म पुन्हा नाही. पुढील काही काळ आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे. काळजी करू नका. काळजी घ्या.
- भाऊसाहेब चासकर (अकोले)
लेखक उपक्रमशील प्राथमिक शिक्षक आहेत.