तातडीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री संतापले
मुंबई - एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. त्यामुळे गंभीर निर्णय घ्यावा लागेल.
बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचे पालन होताना दिसत नाही. शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊन करावे लागेल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
रविवारी आयोजित केलेल्या तातडीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना दिल्या. लॉकडाऊन लागेलच, असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करावे, असे निर्देश देखील त्यांनी मुख्य सचिव आणि इतर संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
ई आयसीयूचा मोठ्या प्रमाणावर सुलभतेने वापर होऊ शकतो त्यामुळे त्यादृष्टीने देखील आरोग्य विभागाने त्वरित पाऊले उचलावीत, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ई आयसीयूवर भर देण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील, असे सांगितले.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिरा रुग्णालयांत पोहचत आहेत ही चिंतेची बाब आहे. अगदी १० ते १८ वयोगटात देखील मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसत असून पुढील काळात तरुणांमध्ये देखील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते अशी भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केली.