मुंबई : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीने (डिएलएचएफ ) केलेल्या कर्ज घोटाळा प्रकरणी 'ईडी' ने या घोटाळ्याशी संबंधित असलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रीती श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांची अंधेरीतील कमर्शियल मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
३५.४८ कोटी रुपयांची मालमत्ता
ईडीने अंधेरी पूर्व येथे कालेडोनिया या इमारतीत प्रीती व राज यांच्या मालकीच्या जवळपास १० हजार ५५० स्क्वेअर फिटच्या दोन कमर्शियल मालमत्ता जप्त केल्या आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपातील जप्ती असून जप्त मालमत्ता ३५.४८ कोटी रुपये इतक्या किमतीची असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मनी लाँडरिंगचाही गुन्हा
डीएचएफएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांनी पीएमसी बँकेत केलेल्या कर्ज घोटाळ्याच्या अनुषंगाने मनी लाँडरिंगचाही गुन्हा दाखल आहे. त्याच गुन्ह्यात मेसर्स जिंदल कंबाइन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स ओरलँडो ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांचे मालक असलेल्या प्रीती व राज श्रॉफ यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.