गरज ! महाराष्ट्राला हवेत आणखी २.२० कोटी लसींचे डोस

मुंबई - राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २.२० कोटी डोस आवश्यक आहेत.


हे लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे. आरोग्यमंत्री टोपे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. 

यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण उपस्थित होते. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात व यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे. 

आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी त्याचबरोबर ६० वर्षावरील व ४५ वयोगटा वरील (सहव्याधी असलेले) सर्वांना लस देण्यात येत आहे. त्यामध्ये १.७७ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. 

या सर्वांना पहिला डोस मे पर्यंत तर दुसरा डोस जून पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी २.२० कोटी कोव्हीडशिल्ड व कोव्हॅक्सिन लसींची आवश्यकता आहे. या अनुषंगाने दर आठवड्यात २० लाख लसींचा पुरवठा हवा आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ पुरेशा लसींचा पुरवठा करण्याची मागणी आरोग्यमंत्री टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली आहे.

२०९ खासगी आणि शासकीय रुग्णालयांना लसीकरण केंद्र, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ३६७ खासगी व शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रास परवानगी देण्याची मागणी केंद्र शासनाकडे केली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !