ठरलं ! 'या' पद्धतीनेच होतील 'दहावी' आणि 'बारावी'च्या परीक्षा

मुंबई - राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरक्षित वातावरणात घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी राज्यभर 'ऑफलाईन' पद्धतीने परीक्षा देण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे, असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सांगितले आहे.

चर्नी रोड येथील बालभवन येथे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परिक्षांबाबत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, एसएससी मंडळाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील, एसईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

शालेय शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावे.

विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करून परिक्षेचे वेळापत्रक ठरवले आहे. वेळापत्रकाबाबत आणखी काही सुचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्याबाबत सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करणे याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार आहे.

सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परिक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच 'एफएक्यु' (FAQ) देण्यात येणार आहेत. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध असतील.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !