मुंबई - सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम हि तर सुरुवात असून भविष्यात राज्यात अनेक ठिकाणी 'करेक्ट कार्यक्रम' राबविणार असा इशाराच शिवसेनेने सामना संपादकीयमधून भाजपला दिला आहे. काही काळापूर्वी भाजमध्ये दाखल झालेले नेते आता वाऱ्याची दिशा ओळखून पुन्हा घराकडे परतत आहेत.
अनेक जण परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत त्यामुळे लवकरच भाजपमधून ओहोटी सुरु होईल. त्यासाठी वेळोवेळी 'करेक्ट कार्यक्रम' राबविला जाईल, असे संकेतहि शिवनेने दिले आहेत.
सांगली महापालिकेत जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला. तेथील पालिकेतील भाजपची सत्ता उलथवून राष्ट्रवादीचा महापौर केला. भाजपाच्या १७ नगरसेवकांनी केले मतदान लक्षणीय ठरले.
परवा तसाच 'करेक्ट कार्यक्रम' जळगाव महानगरपालिकेतही झाला. भाजपच्या २७ नगरसेवकांनी वाऱ्याची दिशा ओळखून शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी मतदान केले. त्यामुळे सांगलीपाठोपाठ जळगावात भाजपचा गड पडला आहे.
जळगावात महापौर आणि उपमहापौर शिवसेनेचाच झाला. त्यामुळे फडणवीसांचे निकटवर्तीय आणि भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना जोरदार धक्का बसला आहे, असेही या लेखात नमूद केले आहे.
एकनाथ खडसे यांचे पुनरागमन
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या राजकारणाची, तसेच जळगाववरील वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे. भारतीय जनता पक्षाचा फुगा एकापाठोपाठ एक फुटू लागला आहे.
महाराष्ट्रात भाजपला तात्पुरती सूज मधल्या काळात आली होती. ही सूज म्हणजे पक्षाची वाढ आहे असा गैरसमज काही मंडळीनी करून घेतला. त्यातून अहंकाराचे वारे भाजप नेत्यांच्या कानात शिरले. त्या अहंकाराचा पाडाव जळगावात झाला.
एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यात राजकीय वितुष्ट आहे. खडसे यांनी भाजप सोडला त्यामागची जी कारणे आहेत त्यातले प्रमुख कारण गिरीश महाजन हे एक आहेच. जळगाव भाजपचा बालेकिल्ला कधीच नव्हता.
महानगरपालिका निवडणुकीत इकडचे तिकडचे लोक फोडून महाजन यांनी पालिकेत भाजपची सत्ता आणली. महाजन यांचा कारभार एकतंत्री व अहंकारी होता. त्यामुळेच भाजप नगरसेवक कंटाळले होते.
महाजन यांचा अहंकार इतक्या टोकाचा की आपल्यात संपूर्ण क्षमता आहे, पक्षाने जबाबदारी दिली तर बारामतीतही विजय मिळवून दाखवतो, अशी भाषा ते करू लागले. इतरांना तुच्छ लेखण्याचा त्यांचा स्वभावच जळगावात भाजपाला घेऊन बुडाला आहे,” अशी टीका देखील करण्यात आली आहे.
योग्य वेळी. योग्य ठिकाणी 'करेक्ट कार्यक्रम'
महाराष्ट्रात भाजपची सत्ता पाच वर्षे होती. त्या सत्तेतून पैसा व पैशांतून सर्व स्तरांवरील सत्ता विकत घेण्यात आल्या. पैसे फेकले की सर्व विकत मिळते हा नवा सिद्धांत भाजपने रुजवला. पण महाराष्ट्रात 105 आमदार निवडून येऊनही भाजपला राज्याची सत्ता मिळवता आली नाही.
सत्ता गेली की अक्कल जाते, अक्कल गेली की भांडवल जाते, भांडवल गेले की कुंपणावरचे कावळे उडून जातात. याचा अनुभव सध्या भाजप घेत आहे. या अनुभवांतून त्यांना शहाणपण आले तर उत्तमच.
सांगली-जळगावात भाजपचा कार्यक्रम एकदम करेक्ट झाला. राज्यात इतर ठिकाणीही अशा करेक्ट कार्यक्रमांचे नियोजन योग्य वेळी होईल. शेवटी सत्ता हेच हत्यार असते व सत्ता हीच संकटमोचक, कवचकुंडले ठरतात.
बाकी सारे अहंकार, गर्व व्यर्थ ठरतात. वाऱ्यावरची वरात वाऱ्याच्या झुळकीबरोबरच नष्ट होते. घाऊक पक्षांतरे करून भाजपने महाराष्ट्रात पक्ष उबदार व गुबगुबीत केला, पण त्याचा पाया भक्कम नव्हता हे आता दिसून आले, असेही स्पष्ट केले आहे.
भय इथले संपत आहे..!
पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपचे नागपूर, पुण्याचे परंपरागत गड पडले. तेथे तर लोकांचे थेट मतदान होते. भाजपच्या हातातून वाळू सरकत असल्याचे तेव्हाच स्पष्ट झाले होते.
महाराष्ट्रात ‘ठाकरे सरकार’ आल्यापासून येथील लोकांच्या मनातले भय नष्ट झाले. त्यामुळे लोक निर्भय बनून मतदान करीत आहेत. ई.डी., आयकर विभागाचे भय सामान्य माणसांना असण्याचे कारण नाही. आतापर्यंत हे भय दाखवूनच भाजपने राजकीय स्वार्थ पाहिला.
पोलीस यंत्रणेचा वापर करून ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुका जिंकल्या. ते भयच आता उरले नसल्याने लोक मुक्तपणे संचार करू लागले आहेत. हा शेवटी सत्तेचाच महिमा असतो.
भाजपने हे महिमामंडन केले. त्यामुळे भाजपला आता महाविकास आघाडीकडे बोट दाखवून आदळआपट करण्याची गरज नाही, असा इशाराही दिला आहे.