- ऍड. उमेश अनपट
आजतागायत अनुभवलेल्या शेवगावच्या विकासाची दयनीय परिस्थिती पाहता अक्षरशः किव येते. त्या तुलनेत आपल्या आजूबाजूचे इतर तालुके आणि तेथील नेतृत्वाने साधलेला विकास पाहिल्यावर शेवगाव किती मागे राहिले हे स्पष्टपणे अधोरेखित होते.
याला जबाबदार कोण ? याबाबत जास्त चर्चा करण्यास वेळ घालण्यात काहीही हासील नाही. त्याचा हिशोब जनतेला मतदानातून करूदेत. त्यापेक्षा येथून पुढे शहराच्या विकासाची वाट कोणत्या मार्गाने नेता येईल, याची चाचपणी आता शेवगावकरांनी केलेली बरी.
मागील आतापर्यंतचा अनुभव पाहता यावेळी कस लावून वेगळा आणि सक्षम पर्याय निवडण्याची नितांत आवश्यकता आहे. तर आणि तरच शेवगावला विकासाचे दिवस दिसतील. अन्यथा पाचवीला पुजलेली साठमारी काही केल्या हटायची नाही. असे झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार शेवगावकरच असतील, हे वेगळे सांगायला नको.
बदलाची संधी नेहमी नेहमी मिळत नसते आणि ती मिळाली तर सोडायची नसते. या निवडणुकीत ती संधी तुमच्या हातात आहे. 'अभी नही, तो कभी नही', अशी आणीबाणीची परिस्थिती नगरपरिषद निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वांनसमोर येऊन ठेपली आहे.
'विकास कशाला म्हणतात रे भाऊ'
आजची परिस्थिती पाहता 'विकास कशाला म्हणतात रे भाऊ', असेच म्हणण्याची वेळ शेवगावकरांवर आहे. रस्ते, वीज, गटारी स्वछता असे मूलभूत प्रश्न अद्याप आ वासून उभे आहेत. याहीपेक्षा कहर म्हणाल तर नियमित पाणी पुरवठा हा शेवगावकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.
कारण, दहा-बारा दिवसांनी होणारा पाणी पुरवठा आता मतदारांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसतेय. येथून मागे हा प्रश्न सुटू शकला नाही याचे भानही ठेवावे लागेल. मग आपला हा प्रश्न केवळ भूल-थापा न मारता खऱ्या अर्थाने कोण मार्गी लावेल त्यालाच यंदाच्या निवडणुकीत कौल देण्याची गरज आहे, असे वाटते.
मग हा पर्याय कोण असेल? तर याचे उत्तर कुठलाही एखादा पक्ष समोर ठेऊन मिळेल, अशी परिस्थिती सध्यातरी दिसत नाही. कारण कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळेल असे वाटत नाही. त्यामुळे पर्यायाचा विचार आधीपासूनच करून ठेवावा लागेल. मग त्यासाठी हवे अनुभवी, विकासाभिमुख नेतृत्व.
'थोरात-राजळे' पॅटर्नची नांदी
शेवगावच्या नगरपरिषद निवडणुकीनंतर गरज भासल्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार मोनिकाताई राजळे या दवयिंचा 'थोरात-राजळे पॅटर्न' अस्तित्वात आल्यास आश्चर्य वाटू नये.
हा पॅटर्न शेवगावच्या राजकारणाला एक वेगळा आणि स्वतंत्र पर्याय देऊ शकतो. राज्यातील सत्तेचा भाग असलेले थोरात यांची ताकद आणि आमदार मोनिका ताई यांचा विकास निधी शेवगावच्या समस्या सोडविण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
तसेच या दोन्ही नेत्यांनी आपापल्या भागात विकासाची गंगा आणलेली आहे. त्यामुळे विकास काय असतो आणि तो कसा करायचा असतो हे त्यांना वेगळे सांगायची गरच नाही.
विकासाभिमुख दूरदृष्टी त्यांच्यात उपजतच असल्याचे दिसते. यातून शेवगावच्या विकासाला एक वेगळी दिशा आणि गती मिळू शकेल. शेवगावच्या पाणीपुरवठ्याचा विषय हे दोन्ही नेते एका विचाराने निश्चित मार्गी लावतील.
त्यात ते एकमेकांचे निकटचे नातेवाईक असल्याने त्यांच्यातील राजकीय ट्युनिग सकारात्मक राहील, असे वाटते. असेही स्थानिक राजकारणात फक्त पक्ष पाहिला जात नाही. येथे उत्कृष्ठ नेतृत्व, चांगली विचारसरणी, स्वच्छ चारित्र्य आणि विकासाची चाढ असणारे नेतृत्व जोखाणण्याची गरज असते.
स्वच्छ चारित्र्याच्या शोधात शेवगावकर
स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार मतदारांना हवे आहेत. काँग्रेसमधील सध्याचे स्थानिक नेतृत्व त्या कक्षेत बसणारे आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव शिवाजी काटे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके हे युवा नेतृत्व उच्च शिक्षित, घरंदाज, आणि कर्तृत्ववान आहेत.
गावचा विकास समोर ठेऊनच ते सध्या पक्षाची मोट बांधताना दिसत आहे. शेवगावच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट त्यांनी तयार केलेली आहे. त्यात पाणीपुरवठा योजनेला प्राधान्य आहे.
याशिवाय आमदार राजळे यांचे शेवगावमध्ये विश्वासाचे, भरवशाचे आणि विकासाची भूमिका असणारे काही नगरसेवक आहेत. वेळ आल्यावर त्यांना प्राधान्य देऊन आमदार ताई नवे समीकरण अस्तित्वात आणतील, यात शंका नाही.
वाढता वाढता वाढे
गावागावात असलेल्या काँग्रेसला घरघर लागली होती. परंतु बाळासाहेब थोरात यांच्याकडे महाराष्ट्राची सूत्रे आल्यानंतर वातावरण बदलले आहे. तसेच नाना पटोले यांच्याकडे प्रदेशाद्यक्षपदाची सूत्रे देऊन काँग्रेसने भविष्यात आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी दर्शवली आहे.
शेवगाव तालुक्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चांगले यश मिळवले आहे.जनतेने काँग्रेसचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परीषदेचे आमदार सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांच्या नेतृत्वार विश्वास दाखवला आहे.
तसेच तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव शिवाजी काटे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बब्बूभाई शेख, सेवादलाचे अध्यक्ष रामकिसन कराड, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कापरे, उपाध्यक्ष पांडुरंग नाबदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष बब्रु वडघने या शिलेदारांच्या परिश्रमामुळे तालुक्यात पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. ताजनापूर, बोडखे, दहिफळ, घोटण ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे उमेवदार विजयी झाले हे त्याचेच द्योतक आहे.
खंबीर पाठबळ
नुकतेच विश्रामगृहावर आमदार तांबे यांनी घेतलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत तालुक्यातील व शहरातील पक्ष संघटन, युवक काँग्रेस व शाखा स्थापनेबाबत तांबे यांनी माहिती घेतली. तसेच आगामी नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारांची यादी सादर करण्यात आली.
आगामी नगरपरिषद निवडणूक आपण पूर्ण ताकतीने लढवावी. पक्ष तुमच्या पाठीशी आहे, असा खंबीर पाठींबा आमदार तांबे यांनी दिला आहे. अर्थात पक्ष श्रेष्ठी बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालीच या सर्व हालचाली चाललेल्या आहेत.
पाणी प्रश्न केंद्रस्थानी
शेवगावकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्नाचा मुद्दा काँग्रेसकडून केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. तथापि, वेळेवर आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी नगरपरिषद निवडणुकीत पुढाकार घेऊन जनतेला न्याय देण्यासाठी लढा द्यावा, असे आवाहन तांबे यांनी केले.
आतापर्यंत वर्षानुवर्षे सत्ता भोगणार्याना हा प्रश्न सोडवता आला नाही, हे देखील खरे आहे. किंबहुना त्यांनी हा प्रश्न राजकीय अभिलाषेपोटी कायम भिजत ठेवला, असा आरोप त्यांच्यावर होताना दिसतो. त्यामुळेच त्यांच्या आश्वासनांना मतदार खूप सिरिअसली घेत नाहीत.
मागील निवडणुकीतही खिचडी सत्ता अस्तित्वात आली होती ती या मुळेच. परिणामी आता पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविणार्या नेतृत्वालाच शेवगावकर कौल देतील. त्यासाठी थोरात-राजळे यांच्या 'टीम'चा पर्याय त्यांना योग्य असेल.
कारण या दोन्ही नेत्यांच्या गावात पाण्याचा प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांनी आपल्याभागात विकासाची गंगा आणलेली आहे. त्यांचा हा विकासाचा पॅटर्न शेवगावकर निश्चित उचलून धरतील.
- लेखक 'MBP Live24' चे मुख्य संपादक,
आणि राजकीय अभ्यासक आहेत.