मुंबई : वादग्रस्त प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत चालल्याने महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एक्शनमोडमध्ये आल्याचे दिसत असून त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांची आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज दोन सत्रात ही बैठक होणार आहे.
नुकत्याच पोलीस अधिकारी सचिन वाझे अटकेपासून ते पूजा चव्हाण आत्महत्या व धनंजय मुंढे प्रकरणापर्यंत अनेक मुद्यांमुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
त्यामुळेच महाविकास आघाडीचे 'शिल्पकार' राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात होणाऱ्या बैठकित सचिन वझे, संजय राठोड, धनंजय मुंडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात सेना राष्ट्रवादीमध्ये झालेली रस्सीखेच या सर्व गोष्टींचा आढावा शरद पवार घेणार आहेत.
धनंजय मुंडे यांच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता आणि या प्रकरणी गुन्हा सुद्धा दाखल केला होता. मात्र, संबंधित तरुणीने गुन्हा मागे घेतल्यामुळे या प्रकरणात धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला.
पण, हे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पूजा चव्हाण नावाच्या तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड चांगलेच अडचणीत सापडले. राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.
भाजप आक्रमक - मुंबईत सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक होत कायद्या आणि सुरक्षेच्या मुद्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहण्यास मिळाली होती. अन्वय नाईक प्रकरणी वक्तव्य केल्यामुळे फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात विशेष हक्कभंग आणला.
मुंबई स्फोटकांनी कार सापडल्या प्रकरणी अधिवेशन संपल्यानंतर सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी झाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका घेत सचिन वाझे काय ओसामा बिन लादेन आहे का? असे विधान केले होते.
मात्र, एनआयएने सचिन वाझे यांना अटक केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. यापार्शवभूमीवरच आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे.