नवी दिल्ली - महाराष्ट्रातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार निवासस्थानी दिल्लीत बैठक सुरू आहे. या बैठकीला महाविकास आघाडीतील नेत्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील बैठकीसाठी दिल्लीमध्ये आले आहेत. शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हेही या बैठकीला उपस्थित आहेत.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे.
काँग्रेसकडून वरिष्ठ नेते कमलनाथ, शिवसेनेकडून संजय राऊत हेही या बैठकीला उपस्थित आहेत. यामुळे महाराष्ट्रात तापलेल्या वातावरणावर काय खल निघणार याची उत्सुकता आहे.
एकीकडे राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला असताना दुसरीकडे तापलेल्या राजकारणाची डोकेदुखी महाविकास आघाडी सरकारच्या समोर येऊन ठेपली आहे.
अनिल देशमुख यांनी मुंबईतून १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री व राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी केंद्रीय संस्थांनी चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असा दावा केला आहे.