बारामती : देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे राजकीय भाकीत केले आहे. आसाममध्ये भाजपला विजय मिळू शकतो, मात्र अन्य राज्यांत त्यांची निश्चित पिछेहाट होईल, अशी परिस्थिती सध्या दिसून येत असल्याचा अंदाज पवार यांनी व्यक्त केलाय.
शरद पवार म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजप व केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. बंगाली संस्कृती आणि तेथील लोकांचे मन यावर आघात करण्याचा प्रयत्न कुणी केला, तर राज्य एकसंध होते. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममतांचे सरकार सत्तेवर येईल, याची पूर्ण खात्री आहे.
केरळमध्ये राष्ट्रवादी डाव्यांच्या सोबतच असून, त्यांना निर्विवाद बहुमत मिळेल. तामिळनाडूचा कल डीएमके म्हणजेच स्टॅलिन यांच्या बाजूने आहे. आसाममध्ये मात्र भाजपची स्थिती तुलनात्मक चांगली आहे, तेथे त्यांचा विजय होईल, असे पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत बोलताना ते म्हणाले की, कधी नव्हे इतके महाराष्ट्र आज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे; पण यातूनही राज्य सरकार निश्चितपणे काही तरी मार्ग काढेल.
शेतकरी अस्वस्थ
शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज चालू शकले नाही. शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशीच संसदही अस्वस्थ आहे. त्यामुळे उद्या याबाबत काही प्रतिक्रिया उमटू शकते, ही शक्यता नाकारता येणार नाही. या शेतकरी आंदोलनाचा केंद्र सरकारला तोटाच होऊ शकतो, असे पवार म्हणाले.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी
दरम्यान, बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल कोशारी यांनी अजूनही निर्णय घेतला नाही. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे काम राज्यपालांचे असते. घटनेने मंत्रिमंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत, असे मतही पवार यांनी व्यक्त केले.