अहमदनगर - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. सोमवारी रुग्णसंख्येने पुन्हा एक हजारांचा टप्पा ओपांडला आहे. त्यामुळे शाळा सुरु ठेवण्याबाबत आता कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
साथरोग अधिनियम १९८७ कलम २ (१) नुसार जिल्हाधिकारी यांना अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीडवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.
जिल्हयात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक आदेश लागू करणेत आलेले आहेत. जिल्हयात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देण्याची गरज आहे.
राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात निर्बंध शिथील व टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उघडणे (मिशन बिगीन अगेन) संदर्भातील मार्गदर्शक सूचनांची दि. १५ एप्रिलपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील इयत्ता १० वी व १२ वी चे वर्ग वगळता सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दिनांक ३० एप्रिलपर्यंत या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.
कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी जर या आदेशाचे उल्लंघन केले, तर ते साथरोग अधिनियम १९८७ मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिताच्या कलम १८८ नुसार दंडनिय व कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.