धक्कादायक ! फी भरली नाही म्हणून 'या' शाळेने मुलांना ठेवले डांबून

पानीपत : शाळेची फी न भरल्याने शाळा प्रशासनाने चिमुकल्यांना थेट उपाशी पोटी डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. पानीपत येथील एक खाजगी शाळेतील या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. दरम्यान काही शाळांनी आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला होता. पण बहुतांशी शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून दिले होते. मात्र या विद्यार्थ्यांकडून शाळेची संपूर्ण फी उकळण्याचे प्रयत्न अनेक शाळांनी केले आहेत. अशातच ही संतापजनक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पानीपत येथील एक खाजगी शाळेने वार्षिक फी भरली नाही, म्हणून  विद्यार्थ्यांना चक्क डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. फी उकळण्यासाठी शाळा प्रशासन दंडेलशाहीचा वापर करत असल्याचा आरोप केला जात आहे. 

वार्षिक फी आणि परिवहन शुल्क जमा न केल्यामुळे, शाळा प्रशासनाने काही मुलांना उपाशीपोटी आणि तहानलेल्या अवस्थेत ओलीस ठेवले.  मुले वेळेवर घरी पोहोचली नाहीत, म्हणून पालकांनी काळजीपोटी शाळेत धाव घेतली, त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला आहे. हा धक्कादायक प्रकार समालखा येथील चुलकाना रोडजवळील डीएव्ही सेनेटरी स्कूलमध्ये घडला आहे. 

एका पालकांने उर्वरित पालकांनाही या घटनेची माहिती दिली. शाळेत आलेल्या इतर पालकांनी शाळेच्या आवारात गोधळ घातला. त्यानंतर शाळा प्रशासनाने मुलांना मुक्त केले. 

शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला असता, त्यांनी या सर्व आरोपाचे खंडन केले आहे. आम्ही मुलांना डांबून ठेवले नाही. एक यादी तयार करून सर्व पालकांना फी जमा करण्याचा संदेश दिला होता. परंतु बहुतांश पालकांनी फी जमा केली नाही. ज्यामुळे शाळेतील सुमारे 50% विद्यार्थ्यांकडे अद्याप फी बाकी आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !