अहमदनगर : 'बाळ बोठे हा आरोपी आहे, की सरकारचा पाहुणा', असा संताप व्यक्त करत हत्या झालेल्या रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहे. तसेच आरोपी बोठेला पोलिसांकडून मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंट विरोधात आज मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे ते तक्रार करणार आहेत. याबाबत योग्य ती दखल न घेतल्यास ४८ तासात आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आज पारनेर न्यायालया समोर हजर करतानाआरोपी बोठेला पोलीस पुन्हा फॉर्च्युनरमधून आणून व्हीआयपी ट्रीटमेंट देणार, की इतर खुनाच्या गुन्ह्यातील सर्वसामान्य आरोपीना नेहमी आणतात तसे पोलिसांच्या पिंजर्यात टाकून आणतात याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
व्हीआयपी ट्रीटमेंट का ?
तब्ब्ल १०२ दिवसानंतर ताब्यात घेतलेल्या रेखा जरे हत्याकांडातील फरार आरोपी बाळ बोठेला काल (ता. १३ शनिवार) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पारनेरमध्ये आलिशान फॉर्च्युनर गाडीत आणण्यात आले. याशिवाय बोठे ला स्वतंत्र कोठडी देण्यात आली होती. कायद्यानुसार कुठल्याही आरोपीला देता येत नाही अशी वागणूक पोलिसांनी एका हत्याकांडातील आरोपी बोठेला दिली.
हा सर्व प्रकार पाहून या हत्याकांडात आपली आई गमावलेले रुणाल जरे संतापले आहेत. 'बाळ बोठे हा आरोपी आहे, की सरकारचा पाहुणा' अशी विचारणा करून पोलिसांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला आहे. तसेच एका गंभीर हत्याकांडातील फरार आरोपीला राष्ट्रध्वज लावलेल्या आलिशान गाडीतून पोलिसांकडून आणलं जातंय, या बाबत दुःख व्यक्त केले आहे. हा राष्ट्रध्वजाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अन्यथा आत्मदहन करणार
पोलिसांकडून बोठेला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटच्या विरोधात रुणाल जरे आज मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. याशिवाय बोठेला व्हीआयपी ट्रीटमेंट देणे न थांबवल्यास ४८ तासात पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आज आरोपी बोठे याला पारनेर न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. काल व्हीआयपी ट्रीटमेंट देऊन केलेली चूक दुरुस्त करण्याची संधी आज पोलिसांना आहे. आज पारनेर न्यायालयासमोर हजर करतानाआरोपी बोठेला पोलीस पुन्हा फॉर्च्युनरमधून आणून व्हीआयपी ट्रीटमेंट देणार, की इतर खुनाच्या गुन्ह्यातील सर्वसामान्य आरोपीना नेहमी आणतात, तसे पोलिसांच्या पिंजर्यात टाकून आणतात, याकडेच आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गळा चिरून ३० नॉव्हेवर रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सुप्या जवळ हत्या करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी काही तासांमध्ये 5 आरोपीना अटक केली होती. मात्र, या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार बाळ बोठे हा फरार झाला होता.