रेखा जरे हत्याकांड : फरार आरोपी बाळ बोठे बाबत न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

अहमदनगर : यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्र्वादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार, आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अडचणीत आता चांगलीच वाढ होणार आहे. पारनेर न्यायालयाच्या कनिष्ठ स्तर प्रथम वर्ग न्यायाधीश उमा बो-हाडे यांनी आज (गुरूवार, ता. ४) आरोपी बोठेला फरार घोषित केले. 

दरम्यान, बोठेला फरार घोषित करावे या मागणीचा अर्ज उपविभागीय पोलीस अधिकारी तथा तपासी अधिकारी अजित पाटील यांनी चार दिवसांपूर्वी पारनेर न्यायालयात केला होता. आता बोठेला फरार घोषित केल्याने बोठेच्या मालमत्तेची, बँक खात्यांची माहिती संकलित करून तपासी अधिकारी न्यायालयात सादर करतील. तसेच सदर मालमत्ता जप्त करण्याची तसेच बँक खाती सिल करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी करतील. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस पुढील कारवाई करतील.

सार्वजनिक ठिकाणी बोठेची छायाचित्रे लावणार 

न्यायालयाने फरार घोषित केल्याने आता बोठेची छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करणे, त्याला पकडून देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येईल. त्यातून बोठेची कोंडी करणे शक्य होणार आहे. बोठेचे काही व्यवसाय असतील तर ते सिल करणेही न्यायालयाच्या संमतीने शक्य होणार आहे. मालमत्ता, व्यवसाय व बँक खाती सिल झाल्यास सगळीकडून आर्थिक कोंडी झालेला बोठे फार काळ फरार राहू शकणार नाही व त्याच्यासमोर पोलीसांना शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, असा पोलिसांना विश्वास आहे.

सुपारी देऊन केली होती हत्या 

यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची सुपारी देऊन नगर-पुणे रस्त्यावर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात  हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पाच आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या आरोपींविरोधात पारनेर न्यायालयात नुकतेच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. जरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासात बोठे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेंव्हापासून पोलिसांची पथके बोठेचा शोध घेत आहेत. मात्र बोठेचा ठाव ठिकाणा लागत नसल्याने तपासी अधिकारी पाटील यांनी बोठेला फरार घोषित करण्याची मागणी न्यायालयात केली होती.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !