राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी रेखा जरे पाटील यांचे हत्याकांड राज्यभर गाजले. एका दैनिकाच्या संपादकाने सुपारी देवून महिलेचा गळा चिरुन खून करण्याची सुपारी दिल्याची बाब समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. परंतु, पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवित या गुन्ह्यातील पाच आरोपी हे जिल्ह्यातुन आणि परजिल्ह्यातून ५०० किलोमीटर दूरवरून कोल्हापूरहून ताब्यात घेतले.
या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार बाळ बोठे हाच या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तेव्हापासूनच बाळ बोठे राहत्या घरातून पसार झाला. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी सुरुवातीला पाच तपास पथके तैनात केली. तरीही बोठेचा ठावठिकाणा लागला नाही. या हत्याकांडाला नव्वद दिवस पूर्ण झाल्यामुळे पोलिसांनी कोर्टात चार्जशीटही दाखल केले.
परंतु फरार बाळ बोठे काही केल्या पोलिसांना सापडत नाही. ही बाब अहमदनगर पोलिस दलासाठी प्रचंड आव्हानात्मक झालेली आहे. या हत्याकांडाच्या तपासाकडे नाशिक परीक्षेत्राचे आयजी प्रताप दिघावकर हेही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यांनीही वेळोवेळी बोठेच्या शोधासाठी गेलेल्या तपास पथकांकडून आढावा घेतलेला आहे. तरीही बोठे सापडलेला नाही.
दरम्यान, गेले काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात बोठेच्या अटकेबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. पोलिसांनी बोठेला ताब्यात घेतले असल्याच्या वावड्या उठत आहेत. याबाबत नगरचे पोलिस अधीक्षक मनाेज पाटील यांनीही अजून अटक झाली नसल्याचा खुलासा केला होता.
एमबीपी लाईव्हचे मुख्य संपादक उमेश अनपट यांनी याप्रकरणी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे विचारणा केली. त्यावर आयजी दिघावकर यांनी महत्वाचा खुलासा केला आहे. बोठे याच्या अटकेच्या चर्चेबाबत त्यांनी अधिकृत माहिती दिली आहे.
आरोपी बोठेला अटक झाल्याच्या सत्यतेबाबत 'एमबीपी लाईव्ह 24' चे मुख्य संपादक ऍड. उमेश अनपट यांनी आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी प्रताप दिघावकर म्हणाले की, बाळ बोठे याच्या अटकेसाठी नगरचे पोलिस कसून प्रयत्न करीत आहेत. सध्या देखील एसपी मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन तपास पथके बोठेचा कसून शोध घेत आहेत. मात्र, त्याला अटक करण्यात अजून यश आलेले नाही. परंतु, लवकरात लवकर बोठेला अटक करुन या हत्याकांडाच्या तपासाला अधिक गती देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच नियमितपणे या तपासाचा आढावा घेतला जात आहे.