अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी महत्वपूर्ण खुलासा केला आहे. आरोपी बोठे याला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर अटक करण्यात आली असल्याची चर्चा सध्या अहमदनगर जिल्ह्यात सुरू आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून अहमदनगर शहरासह जिल्ह्यात चालू आहे. मात्र बोठे ला अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
फरार आरोपी बाळ बोठे हा पोलिसांच्या ताब्यात असल्याबाबत अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील योनी खुलासा केला असून ही बातमी अफवा असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
30 नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र तेव्हापासून बोठे हा फरार आहे.
दरम्यान, आरोपी बोठे याला फरार घोषित करण्याच्या मागणीचा अर्ज पारनेर न्यायालयाने मंजूर केला आहे. त्याला पोलिसांसमोर हजर होण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर संपत्ती जप्तीची कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती तपास अधिकाटी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी दिली. बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.