नागपूर : पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर एकटी राहणाऱ्या विधवा महिलेला एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने फेसबुकवरून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर शारीरिक अत्याचार केला आणि चार लाखांना लुबाडले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे नागपूर पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे १९९८ ला एका शिक्षकाशी लग्न झाले होते. त्यांना मुलगा असून तो पुण्यात शिकतो. २०१० साली पतीचा अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून ती मुलाला घेऊन सासरकडे राहत होती.
एकाकी जीवन जगत असलेल्या महिलेला फेसबुकवर पोलिस निरीक्षक अरविंद भोळे याची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्याने तिच्याशी चॅटिंग करीत सर्व माहिती घेत तिला जाळ्यात ओढले. ओळख झाल्यानंतर त्यांनी आपआपले मोबाईल क्रमांक ऐकमेकांना दिले. मोबाईलवर ते तासनतास बोलत.
भोळे याने ‘आपली पत्नी नेहमी आजारी असते. त्यामुळे आपल्याला दुसरे लग्न करायचे असल्याचे सांगून महिलेला विश्वासात घेतले. ८ नोव्हेंबर २०२० ला कौंडण्यापूर (जि. वर्धा) येथील एका मंदिरात लग्न केले. त्यावेळी भोळे नंदनवन येथील फ्लॅटमध्ये राहत होता.
लग्नानंतर त्याने महिलेला घेऊन फ्रेण्ड्स कॉलनी येथील फ्लॅट भाड्याने घेतला. पीआय भोळे याने पत्नीसोबत मोबाईलने अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. दरम्यान, पहिल्या पत्नीच्या उपचारासाठी भोळेने महिलेकडून एक लाख रुपये उकळले. तीन लाख रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या परस्पर विकल्या.
भोळे याचा महिलेच्या वडिलोपार्जित शेतीवर डोळा होता. ‘शेती माझ्या नावावर करून दे’, असे तो तिला म्हणत होता. महिलेने नकार देताच त्याने दारू पिऊन तिला मारहाण देखील करीत होता. १८ फेब्रुवारीला भोळे घरातून पैसे घेऊन पळून गेला. महिलेला एकटी सोडल्यानंतर तो १५ दिवसांची आजारी रजा टाकून बाहेरगावी गेला.
दरम्यान महिलेने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना हकीकत सांगितली. या घटनेचे गंभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्तांनी भोळे याला तडकाफडकी निलंबित केले आहे. भोळे याला अटक करण्यासाठी लवकरच पोलिसांचे एक पथक नाशिकला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.