पेट्रोल दरवाढीच्या डोकेदुखीवर जुगाडू बाईकची मात्रा

मुंबई : देशभरातील नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे चिंतेत आहेत. पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत आणि हा खर्च टाळण्यासाठी लोकांनी एक वेगळाच जुगाड केला आहे. पेट्रोलच्या झंझटपासून मुक्तता मिळवण्यासाठी अनेक जण त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये कनव्हर्ट करत आहेत. त्यामुळे त्यांची बाईक आता पेट्रोलऐवजी बॅटरीवर धावतेय.

भारतात कोणालाही कोणत्याही गोष्टीचा जुगाड मिळू शकतो. इथले लोक त्यांच्या गरजेनुसार वेगवेगळे जुगाड करत असतात. तसेच आता बरेच लोक त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन काढून त्याजागी बॅटरी बसवून घेत आहेत. म्हणजेच आता गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी बाईकमधील बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. 

याचाच अर्थ तुमची गाडी आता विजेवर चालू शकते. त्यावरील खर्च हा पेट्रोलच्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत बाईकमधील पेट्रोल इंजिन रुपांतरित कसे होते? त्याची किंमत किती आहे? असं करणं योग्य आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. 

दहा हजारात काम फत्ते

बरेच लोक सध्या सोशल मीडियावर स्वत: ची जाहिरात करत आहेत, अनेकांनी असा दावा केला आहे की ते त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतरित करीत आहेत. यावर केवळ 10 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचा दावा ते करत आहेत. 

बॅटरीनुसार शुल्कही बदलते. दरम्यान, इंजिन बदल करणाऱ्या एका मेकॅनिकने या बाईकच्या वेगाविषयी दावा केला आहे, सदर बाईक ताशी ६५-७० किमी इतक्या वेगाने धावते.

इंजिन कसे बदलतात?

पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरित करताना, गीअर बॉक्स काढून टाकला जातो आणि त्यानंतर बाईक थेट अॅक्सिलरेटरद्वारे नियंत्रित केली जाते. म्हणजेच जशी तुम्ही स्कूटी चालवता अगदी तशीच बाईक चालवता येते. परंतु अशा प्रकारे स्कूटीचे इंजिन बदलले जाऊ शकत नाही, त्यासाठी बरेच बदल करावे लागतील. त्यामुळे त्यावर खूप खर्च करावा लागतो.

किती फायदा होणार?

बाईकला बसवलेली बॅटरी तुम्ही २ तास चार्ज केली तर ही बाईक 40 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. बॅटरी पूर्ण चार्ज केली तर बाईक तब्बल 300 किमीपर्यंतची रेंज देते, असा दावाही जुगाडू लोकांकडून केला जात आहे. परंतु या बाबी तुम्ही कोणती बॅटरी वापरताय, यावर अवलंबून आहेत.

बेकायदेशीर जुगाड

अशा पद्धतीने तुमच्या बाईकमधील इंजिन बदलत असाल तर हा कायद्याने गुन्हा आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 52 नुसार कोणत्याही मोटार वाहनात बदल करणे, इंजिन बदलणे हा कायदेशीर गुन्हा आहे. 

या नियमाप्रमाणे कोणतीही व्यक्ती कंपनीने बनवलेल्या कार किंवा बाईकमध्ये बदल करू शकत नाही. जर तसे केले तर हा गुन्हा ठरतो आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच इंजिन बदलल्यामुळे तुमचा विमा देखील समाप्त होऊ शकतो. याचे भान ठेऊन हा जुगाड करा.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !