मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या 'अॅन्टिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेली स्कॉर्पिओ जीप आणि त्यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी ठाकरे सरकारच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांसमवेत एक तास चर्चा केली.
या चर्चेचा केंद्रबिंदू सचिन वाझे असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदल संदर्भातही महत्वाची चर्चा झातयाचे समजते. त्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांची गचत्तीं होण्याची शक्यता आहे.
सचिन वाझे बनले डोकेदुखी
मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला होता. त्यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरणाचा तपास 'एनआयए'ने हाती घेतला आणि त्या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. आता त्यांची कसून चौकशी सुरू आहे. विरोधक हे सचिन वाझे यांच्या शिवसेनेशी असलेल्या संबंधांकडे बोट दाखवत आहेत.
त्यामुळे शिवसेनेचीही गोची झाली आहे. निलंबित असलेल्या वाझे यांना पोलीस सेवेत घेतलेच कसे, असा प्रश्न केला जात आहे. गृहखाते अनिल देशमुख यांच्याकडे असल्याने राष्ट्रवादीही विरोधकांच्या रडारवर आली आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा यावर पवार आणि ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
मंत्रिमंडळात खांदेपालट ?
गेले वर्षभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. सुशात सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ते आताचे सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही जेष्ठ नेत्यांमध्ये आहे.
त्या पार्शवभूमीवर शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रिपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची चर्चा आहे.
काय आहे प्रकरण ?
रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारीला एक स्कॉर्पिओ जीप आढळली होती. त्यात स्फोटके आणि एक धमकीचे पत्र सापडले होते. याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून हा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला.
सोबतच राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) समांतर तपास करत होते. नंतर वाझे यांच्याकडून तपास काढून घेऊन गुन्हे शाखेतील सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे यांच्याकडे देण्यात आला. दरम्यान, अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ जीप ज्यांच्या ताब्यात होती.
ते ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांचा 5 मार्च रोजी मृतदेह सापडला आणि या प्रकरणाचे गूढ व गुंता आणखीच वाढला होता. एनआयएच्या तपासात वझेयांच्यावर ठपका ठेऊन त्यांच्या अटकेची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने वझे यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.