नाशिक : शेतकऱयांच्या अडचणी काही केल्या संपायला तयार नाहीत. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला असताना आता शेतकऱ्याला भाव घसरणीचा सामना करावा लागत आहे. लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समित्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात गडगडले आहे
४१ रुपयांहून १२ रुपयांवर घसरण
भावात अचानक मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या महिन्यात ज्या कांद्याला प्रति किलो 41 रुपये भाव मिळाला होता, तोच कांदा आज 10 ते 12 रुपये दराने विकला जात आहे.
आवक स्थिर असताना देखील कांद्याच्या भावात मोठी घसरण का होत आहे? असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. तर इतर राज्यात कांद्याची मागणी घटल्याने भाव गडगडले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
उत्पादनही घटले
लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी मोठ्या प्रमाणात नगदी पिक मानला जात असलेल्या कांद्याची लागवड करतात. मात्र गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेल्या कांद्या पाठोपाठ कांदा रोप आणि कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अतिवृष्टीमुळे एका एकरात सरासरी कांद्याचे उत्पादन 15 ते 20 टक्क्यावर आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. अलीकडे कांद्याला प्रती क्विंटल कमाल ४ हजार १०१ रुपये, तर सरासरी३ हजार ७०० रुपये इतका भाव मिळत होता.