कै. निर्मलाताई काकडे यांना 'जनशक्ती'तर्फे अभिवादन

शेवगाव - जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डी च्यावतीने कै. निर्मलाताई काकडे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


‘छात्रालय हायस्कूल’ची स्थापना

सन १९६७ साली शेवगाव सारख्या ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या मुला-मुलींसाठी कॉम्रेड आबासाहेब काकडे यांच्या मदतीने ‘छात्रालय हायस्कूल’ म्हणजेच आजचे ‘आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव’ची निर्मलाताई यांनी स्थापना केली. शाळेला कोणतेही अनुदान नसताना शिपाई, कारकून, शिक्षिका,  मुख्याध्यापिका या सर्व भूमिका स्वतः बजावून प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्दीने त्यांनी ध्येयपूर्ती मिळविली.

'ताई' बनल्या मुलींच्या शिक्षणाचा आधार
स्वभावातील जिव्हाळ्यामुळे तालुक्यात ‘ताई’ म्हणून ख्याती मिळविली. स्वतःच्या संसारापेक्षा ज्ञान प्रसाराला अधिक महत्त्व त्यांनी दिले. शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील असंख्य मुलींच्या शिक्षणाचा त्या आधार बनल्या. आपल्या कर्तृत्वाने पालकांमध्ये विश्वास निर्माण करून वस्तीगृहातील मुलींचे पालकत्व स्वतः स्वीकारून स्वतःच्या मुलींप्रमाणे त्यांनी त्यांचा सांभाळ केला.

हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले
एक आदर्श व्यक्तिमत्व, एक कणखर शिस्तप्रिय, परंतु त्या मृदू व प्रेमळ होत्या. साधी राहणी, उच्चविचारसरणी, आदर्श, उत्तम संस्कार, त्याग आणि सद्विचारांची शिकवण त्यांनी समाजाला दिली. शेवगाव-पाथर्डी परिसरातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. 

विद्यार्थ्यांना शिस्तीचे व सुसंस्काराचे धडे देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी बजावले. जनशक्ती विकास आघाडी व आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाकडून पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, ऍड. शिवाजीराव काकडे, आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष सुरेश नाना चौधरी, राजेंद्र पोटफोडे, स्वभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत भराट, प्रा.सोपानराव पूरनाळे, बी. एड. चे प्राचार्य अरुण चोथे, प्रेमचंद भांबरे, लक्ष्मण राठोड, रमेश राठोड, अर्जुन गोळीवाळे, अर्जुन काळुसे, बाळासाहेब पोटफोडे, बबनराव गायकवाड आदी उपस्थित होते.


buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !