सांगली - पोलीस दलाने आधुनिकीकरणाकडे पाऊल टाकले आहे. त्यामुळे शहरात सीसीटीव्हींची संख्या वाढविणे गरजेचे आहे. पोलिसांची नजर नाही असा एकही शहराचा कोपरा राहू नये, अशी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त निधीमधून पोलीस दलाने २५ स्कॉर्पिओ जीप तसेच ५० मोटरसायकल खरेदी केल्या. या वाहनांचे लोर्कापण पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते पोलीस मुख्यालय सांगली येथील मैदानावर करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
लॉकडाऊन काळात कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी अत्यंत चांगले काम केले आहे. समाजाची गरज ओळखून पोलीस काम करत असतात. संपूर्ण समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. कोरोना काळापासून पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे, असेही ते म्हणाले.
पोलिसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना चांगला आधार दिल्यास व चांगली अत्याधुनिक सुविधा दिल्यास ते अधिक कार्यक्षमतेने काम करतील, असे जयंत पाटील म्हणाले. इस्लामपूर व विटा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था व गुन्हेगारी रोखण्यास चांगली मदत होणार आहे.
सांगली शहरातील प्रत्येक बीटवर गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक संबंधित भागातील नागरिकांना द्यावा. त्यामुळे नागरिकांना तात्काळ त्यांच्याशी संपर्क साधता येईल व पोलीस घटनास्थळी तात्काळ पोहोचतील. असे झाल्यास पोलीसांची वचकही निर्माण होईल, असे ते म्हणाले.