'चलो दिल्लीगेट' ! एमपीएस्सी परीक्षा पुढे ढकलली म्हणून विद्यार्थ्यांनी केले 'असे काही'

अहमदनगर - महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येंच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयाविरोधात विद्यार्थी चांगलेच संतापले झाले आहेत. या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले. दिल्लीगेट वेशीजवळ जमून विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज झाला आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीनं अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे ? ह्या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. या आंदोलनात विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. 

अधिवेशन आणि लग्न होतात मग एमपीएससी परीक्षा का नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून यावेळी उपस्थित करण्यात आला. काही वेळाने पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्याव्यात, असे आवाहन यावेळी करण्यात आले. दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. 

बाजीराव शेळके, सुरेंद्र बडे, पांडूरंग ढाकणे, ज्ञानेश्वर नागरगोजे व आदी विद्यार्थ्यांनी मिळून दिल्लीगेट परिसरात एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. कोरोनाचे नियम पाळत हे आंदोलन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना नेले पोलिस ठाण्यात

दरम्यान, या आंदोलनाची माहिती मिळताच तोफखाना पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी काही विद्यार्थ्यांची धरपकड केली आहे. या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वाहनात बसवून घेऊन तोफखाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. अचानकपणे पूर्वकल्पना न देता आंदोलन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेतले. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !