मराठा आरक्षण ! खासदार उदयनराजे का संतापले ?

मुंबई : 'मराठा समाजाला आरक्षण द्या, अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या', अशा मथळ्याखाली फेसबुक पोस्ट लिहून  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला आहे.

एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात आरक्षण या विषयावर एककलमी कार्यक्रम हाती घ्या. कोरोनाने भरपूर वेळ दिला आहे. अन्यायाविरुद्ध झुंजत असलेल्या समाजाच्या प्रश्नासाठी हा वेळ द्या. मराठा आरक्षणाचा निकाल तातडीने लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा, असा इशाराच उदयनराजे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात का? मराठा समाजातील लाखो तरुण निराशेच्या गर्तेत आहेत. 

आरक्षणाचा प्रश्न आता सुटला नाही तर तो कधीच सुटू शकत नाही याची जाणीव मराठा समाजातील तरुणांना झाली असून सरकारने गांभीर्याने घेतले नाही तर मराठा समाजातील तरुण वेगळे पाऊल उचलू शकतात. आम्हाला मराठा आरक्षण तरी द्या अन्यथा विष पिऊन मरु द्या.

आजपर्यंत ४० पेक्षाही जास्त मराठा बांधवांनी आरक्षणाच्या प्रश्नासाठी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठीचा रस्त्यावरचा संघर्ष देशाने पाहिला आहे. गुरं-ढोरं, बायका-मुलांसह मराठा समाज क्रांती मोर्चा दरम्यान रस्त्यावर उतरला होता. न्यायालयात कायद्याला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने जी पावले उचलायला हवी होती ती पावले का उचलली नाहीत? या कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सरकारने केलेली कार्यवाहीही सदोष होती. 

कायद्याला मिळालेली स्थगिती उठवायची असेल तर आदेशाच्याविरोधात रिव्ह्यूव पिटिशन का दाखल केले नाही? राज्य सरकारने सुधारित अर्ज का दाखल केला? जेव्हा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आला तेव्हा कोणतीही बाजू न मांडता आम्हाला सुनावणी घटनापीठासमोर करायची असल्याचे राज्य सरकारने न्यायलयाला का सांगितले? 

त्यानंतर जेव्हा घटनापीठासमोर सुनावणी सुरु झाली तेव्हा आपली तयारी नसल्याचे सांगून सरकारने तयारीसाठी वेळ का मागितला? हा घटनाक्रम पाहिला तर राज्य सरकारमध्ये बसलेले मराठा आरक्षणासंदर्भात किती उदासिन आहेत हे लक्षात येते. त्यामुळे राज्यकर्त्यांबाबत मराठा समाजातील तरुणांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.

एकीकडे एसईबीसी पात्र उमेदवारांना ईडब्ल्यूएस लागू करण्याचा निर्णय घ्यायचा आणि दुसरीकडे एसईबीसीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात वेळकाढूपणा करायचा ही कसली नीती आहे? मराठा समाजाने तुम्हाला एवढी वर्षे सत्ता दिली त्याचे तुम्ही असे पांग फेडत आहात का? 

दिरंगाईची ही खदखद कोणत्या टोकाला जाईल, हे आता मीही सांगू शकत नाही, राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या प्रश्नात गंभीर नसल्याने मी स्वत: खा. शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्या भेटी घेवून त्यांना वस्तुस्थिती सांगितली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीतही मी माझी मते मांडली आहेत. मात्र, अशा बैठकांमध्येही राज्य सरकार गंभीर नसल्याचे मला जाणवत आहे. बैठकांनंतर कोणताही फॉलोअप का घेतला जात नाही? केवळ वेळकाढूपणा सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यानही याबाबत कोणतेही सुतोवाच होत नाही.
 

याचा अर्थ तुम्हाला मराठा आरक्षण द्यायचेच नाही. मराठा समाजातील युवक-युवती फक्त तुम्हाला तुमच्या पक्षांच्या राजकीय सभांना, मेळाव्यांना गर्दी करायला हवे आहेत का? रस्त्यारस्त्यांवर तुमच्या पक्षांचे झेंडे लावायला हवे आहेत का? बुथवर मतांचा गल्ला गोळा करायला हवे आहेत का? 

नोकऱ्यांविना तडफडणारे हे जीव तुम्हाला दिसत नाहीत का? पोटे खपाटीला गेलेले त्यांचे आईवडील तुम्हाला दिसत नाहीत का? काबाड कष्ट करुनही आणि मेरीटमध्ये येवूनही संधी उपलब्ध होत नसल्याने या तरुणांनी नक्षलवाद स्वीकारला तर त्याला राज्यकर्ते म्हणून तुम्हीच जबाबदार नाही का?

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !